Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजा मतदारसंघात अनेकांनी कंबर कसली!

– डॉ. सुनील कायंदे यांच्यासह योगेश जाधव, गायत्री शिंगणे हे तरूण उमेदवार रिंगणात उतरण्यास सज्ज!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आपले स्थान बळकट करण्यासाठी अनेक इच्छुक नेत्यांनी दंड थोपटले आहेत. परंतु, डॉ.राजेंद्र शिंगणे यांना कसे थांबवायचे, याचे चक्रव्यूह कोणीच तयार केले नाही. त्यामुळे राजकारणात महाभारत घडविण्यासाठी अर्जुनापेक्षा श्रीकृष्ण कोण ठरणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदारसंघात डॉ. सुनील तोताराम कायंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली असून, ती नेमकी कुणाला दणका देणार, याबाबत राजकीय चर्चा झडत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर राजकीय पोष्ट झळकत आहेत. विशेष करून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गायत्री शिंगणे यांनी जो घराचा होऊ शकत नाही, तो पक्ष काय सांभाळेल, अशी टिप्पणी करून पक्षातील कार्याध्यक्षावर तोफ डागली. कारणही तसेच आहे. एका पब्लिक चॅनलवर नरेश शेळके यांनी बुलढाणा, मेहकर आणि जळगाव जामोद हे तीन मतदारसंघ शरद पवार यांच्याकडे मागितले आहेत. या तीन मतदारसंघात सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी पवारांना सांगितले. सिंदखेडराजा मतदारसंघात पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, असेही भाकित वर्तविले. यावर प्रतिक्रिया देताना गायत्री गणेश शिंगणे यांनी समाचार घेतला. जो घरचा होऊ शकत नाही, तो पक्षाचा कसा होईल! असे नाव न घेता टिप्पणी केली आहे. यावरच त्या थांबल्या नाहीत तर पुढे बोलताना म्हणाल्या, की लोकसभा निवडणुकीत कोणी कोणत्या पक्षाचे काम केले, याची माहिती शरदचंद्र पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब यांना दिली गेली आहे. कारण पक्षाची पदे घ्यायची आणि संसार दुसरीकडे थाटायचा, असा अर्थ निघतो.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे हाच पक्ष आणि हाच आमचा नेता असे समीकरण १९९५ पासून लागू आहे. ते ज्या पक्षात जातील त्याकडे मतदारांचा कल राहिला आहे. कै. मुन्ना उर्फ गणेश शिंगणे हे साहेबांसोबत होते. तेव्हा गणेश शिंगणे यांना मानणारा एक वर्ग होता. मुन्ना शिंगणे यांना एकतरी जिल्हा परिषद सर्कल द्यावे, अशी मागणी होती. परंतु, त्यांना जिल्हा परिषद सदस्य, बँकेच्या संचालक मंडळात, सुत गिरणी अशा कोणत्याही पदावर घेण्यात आले नाही. अखेर त्यांचा अकाली मृत्यू झाला, आणि राजकीयदृष्ट्या गणेश शिंगणे यांचे घराणे दूर गेले. आता किमान गौरी गणेश शिंगणे यांना शेंदुर्जन किंवा साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक रिंगणात साहेब उतरवतील, अशी अपेक्षा काहींची होती. पण तसे काहीच झाले नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. अखेर गौरीताई शिंगणे यांनी गायंत्री गणेश शिंगणे यांचा राजकीय मार्ग मोकळा करून दिला. हळूहळू त्यांनी मतदार संघात स्थान बळकट करण्यासाठी दौरे सुरू केले. शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद घेऊन आपले आजोबा भास्करराव शिंगणे यांनी राजकीय क्षेत्रात काम करताना काय हातखंडे वापरली यावर अभ्यास करून पावले टाकत मतदारसंघात शरद पवार यांची ताकद काय आहे. याचा प्रत्यय दाखविण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यासोबत गोतावळा नसला तरी अनेक मराठा लॉबीतली मंडळी थेट पवार साहेब यांसह अनेकांना भेटून आली आहे. हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट (सोबत काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना) अशी लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपचे नेते तोताराम कायंदे हे माजी आमदार आहेत. त्यांनी दोनवेळा या मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता, तोही अपक्ष म्हणून. आजही त्यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. प्रत्येक खेड्यात कार्यकर्ता आहे. भाजप पक्षात जेवढी त्यांची पकड आहे, त्याहीपेक्षा इतर पक्षात त्यांची ओळख आहे. शिंदे गट असो, की उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो, काँग्रेस पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांनी दुरावा निर्माण केला नाही. डॉ.सुनील कायंदे यांच्यापेक्षा ते राजकारणात सरस राहिले आहेत. तथापि, सुनील कायंदे यांचाही मतदारसंघात व्यापक जनसंपर्क आहे. भाजपाने ही जागा युती धर्म पाळून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर त्यांच्याजवळ शरदचंद्र पवार यांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच तोताराम कायंदे किंवा डॉ. सुनील कायंदे या पिता-पुत्रांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे राजकीय चित्र आहे. शिवसेना शिंदे गटात शीतयुध्द सुरु झाले आहे. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आपली पकड घट्ट करण्याचे काम सुरू केले आहे. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विकास कामांचा आढावा मांडून निधी मंजूर करून कामाचा धडाका सुरू ठेवला आहे.
माजी आमदार असताना त्यांना आजही महत्त्वाचे स्थान मिळत आहे. त्यांना मानणारा वर्ग मतदार संघात खूप मोठा आहे. त्यांना पक्षाचे युवासेना नेते योगेश जाधव यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. टँकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा करुन, संत संमेलन घेऊन, गावात डीपी मंजूर करून ते जनमाणसात आपली प्रतिमा निर्माण करत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजीगर ठरणार आहे, हे काळच ठरवेल. वंचित बहुजन आघाडीकडे सविता मुंढे हा चेहरा असला तरी लोकसभा निवडणुकीत वसंत मगर यांनी २० हजारांपेक्षा जास्त मते घेऊन आपणही विधानसभा निवडणुकीत उतरले तर.. याची चाचपणी सुरू केली आहे. ओंबीसी आणि दलित मते ही निर्णायक मते आहेत. आजपर्यंत ही मते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बाजूने उभी राहिली आहेत. त्यामुळे त्यांचे विजयाचे गणित जुळले आहे. वसंतराव मगर नेमकं काय करु शकतात हे बघावे लागेल. त्यांनी अनेक पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, ती न मिळाल्याने त्यांनी सोयीस्करपणे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा हात हातात घेऊन चालण्याची सवय कायम ठेवली तर काहीही होऊ शकते हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!