बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सोमवारी (दि.१५) जिल्हा दौर्यावर येत आहेत. यामध्ये विविध कार्यक्रमांसह अतिवृष्टीमुळे खामगाव तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.
केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे दिनांक १५ जुलैरोजी सकाळी १० वाजता मेहकर तालुक्यातील दुधा येथील ओलांडेश्वर संस्थान येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्यावतीने पेनटाकळी प्रकल्पाच्या पाझरामुळे झालेल्या नुकसानीचे धनादेश वितरण करणार आहेत. दुपारी १२.२० वाजता शेगाव येथे एका लग्नसमारंभास उपस्थित राहून दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान खामगाव तालुक्यातील कोलोरी, पिंप्री गवळी, टेंभुर्णा व अंत्रज शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर खामगाव तालुक्यातील लोखंडा तसेच लोणार येथे खाजगी कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, सोयीनुसार मेहकरकडे प्रस्थान करणार आहेत, असे खाजगी सचिव डॉ.गोपाल डिके यांनी कळविले आहे.