बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १५ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील महसूल कर्मचारीदेखील सहभागी झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले होते. दरम्यान, संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सविस्तर असे, की दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध न करता लागू करावा, अव्वल कारकून, मंडळ अधिाकरी संवर्कातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी, महसूल विभाग तसेच अंतर्गत संजय गांधी योजना, रोहयो निर्वाचन व तत्सम विभागांचे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याचा शासन निर्णय जारी करावा, महसूल सहायकांचा ग्रेड-पे २४०० रुपये करावा, महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकार उदासीन धोरण राबवित असल्याने संघटनेच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली. यापूर्वी १० जुलैला काळ्याफिती लावून काम करण्यात आले. ११ जुलैरोजी निदर्शने, १२ जुलैला लेखणीबंद आंदोलन करण्यात आले होते. तर १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी राज्यातील सुमारे ३५ हजार महसूल कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनादेखील सहभागी झाल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर हटकर, सरचिटणीस गजानन मोतेकर, चैतन्य मोहणे, प्रशांत रिंढे, अमोल घुसळकर, आत्माराम चव्हाण, प्रेमकिशोर यादव, रवी पंघाळे, संदीप बोंद्रे, संजय गवई, राजीव जाधव, प्रमोद दळेकर, सोनल वाघमारे, विजया डुकरे, केतकी भुसारी, स्वाती पुरी, स्मिता ठेगळे आदी कर्मचार्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.