ChikhaliCrimeVidharbha

शिंदे गटाचे युवा उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांच्याविरूद्ध अखेर गुन्हे दाखल

मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील इसरूळ गावाचे माजी सरपंचपती तथा शिंदे गटाचे युवा उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांच्याविरोधात अखेर अंढेरा पोलिस ठाण्यात स्वतः चिखली तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला आहे. भुतेकर यांना जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल अधिकार्‍यांविरोधात अपशब्द वापरणे भोवले आहे. भुतेकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या बॅनरवरील फोटोला बुटाने हाणून जिल्हाधिकारी यांच्यासह चिखली व देऊळगावराजाच्या तहसीलदारांच्या बदनामीचा प्रयत्न केला होता.

सविस्तर असे, की दिनांक १३ जुलै २०२४ रोजी शिवसेना शिंदे गट युवा उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी इसरुळ येथे गावातील लोकांना एकत्र करून जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच चिखली तहसीलदार तसेच देऊळगाव तहसीलदार यांना अपशब्द वापरून जिल्हाधिकारी यांना बुटाने मारून व बोंबाबोंब आंदोलन करून महसूल विभागाचा निषेध केला होता. तसेच, ये महसूल चोर है, फिरभी शिरजोर है.. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व त्यांचे सर्व महसूल टीम.. असे वाक्य बॅनरवर छापून एक व्हिडिओ तयार केला. सदर व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी बुलढाणा यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, निषेध हा असा तसा न करता, हा रोड, ही गाडी, हा तुमचा फोटो.. यावेळी बॅनरवरील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या फोटोला संतोष भुतेकर व गावातील इतर त्यांच्या सहकार्‍यांनी बुटाने मारले. देऊळगावराजा व चिखली तहसीलदारांच्या नावाने बोंबाबोंब असे म्हणत जोरजोरात घोषणा दिल्या, व सदर व्हिडिओ हा मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला. सदर व्हिडिओ हा व्हायरल झाल्यामुळे व्हिडिओमधील संतोष भुतेकर तसेच त्यांचे साथीदार दीपक फकीरबुवा पिंगळे, समाधान मधुकर भुतेकर, अविनाश गजानन भुतेकर, प्रताप भगवान भुतेकर सर्व राहणार इसरुळ यांच्याविरोधात जिल्हाधिकारी बुलढाणा यांचा जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या पदाचा व त्यांच्या नावाचा तसेच तहसीलदार चिखली व तहसीलदार देऊळगावराजा यांच्या पदाचा कोणताही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता अवमान व बदनामी केली आहे. सदरचा व्हिडिओ तयार करून व्हाट्सअपवर प्रसारित केला आहे. त्यामुळे संतोष भुतेकर व त्यांचे साथीदार सर्व राहणार इसरुळ यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ३५६ (२)-(३) सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कायदेशीर तक्रार चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून संतोष भुतेकर यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!