गोरेगाव फाट्यावरील उपचार व धर्मप्रसार केंद्र ताबडतोब बंद करा; अन्यथा आंदोलन, हिंदुत्ववादी संघटनांचा साखरखेर्डा पोलिसांना इशारा
– विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाने दिले ठाणेदारांना निवेदन
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीमध्ये येणार्या व साखरखेर्डा ते शेंदुर्जन रस्त्यावर असलेल्या गोरेगाव फाट्यावर काही युवकांनी ख्रिश्चन धर्माचा आधार घेऊन, गोरगरीब, अज्ञानी महिला व पुरुषांना असाध्य आजारातून बरे करण्याचा दावा करत, त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. हा सरळसरळ बुवाबाजीचा प्रकार आहे. दररविवारी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असून, हे कथित उपचार केंद्र व बेकायदेशीर धर्मप्रसार केंद्र तात्काळ बंद करावे, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी साखरखेर्डा पोलिसांना दिला आहे.
दर रविवारी या कथित उपचार केंद्रावर दूूरदूूरवरुन अनेक चारचाकी वाहनांद्वारे सुमारे दोन ते तीन हजार महिला व पुरुष उपचारासाठी येतात. मेनरोडवरच एक ते दोन किलोमीटर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अमूक धर्म स्वीकारल्यास तुमच्यावरील असाध्य आजार दूर होतात, असा सल्ला दिला जातो. कुठलीही वैद्यकीय पदवी व परवानगी नसतांंना बेकायदेशीर लोकांंचा समूह जमवून प्रार्थनास्थळ नसतांना अंधश्रद्धेच्या आधाराने धर्माच्या नावाखाली लोकांना पैसा व व त्यांचे आजार दूर करण्याच्या नावाखाली औषधोपचार करून फसवणूक केली जाते. त्यासाठी घरातील हिंदू देवीदेवतांचे प्रतीक असलेले फोटो व इतर साहित्य नष्ट करा, आणि बायबलचे पठण करा, असा संदेश ते देत आहेत, असेही हिंदुत्ववादी संघटनांनी नमूद केलेले आहे. या केंद्रात उपचार करणारा मुख्य इसम व इतर पाचजण यांंनी यापूर्वीही असेच प्रकार केले असल्याने, त्यांच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात कोरोना काळात निवेदन दिले होते. चिखली पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी बेकायदेशीरपणे औषधोपचार व धर्म परिवर्तन करण्यात येत असलेले धर्मांतरण केंद्र तात्काळ बंद करून संबंधितावर कारवाई करावी, असेही हिंदुत्ववादी संघटनांच्या निवेदनात नमूद आहे.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे धर्म जागरण प्रांत अध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, प्रांत सहसंस्कृती प्रमुख गजानन महाराज सपकाळ, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंंत्री शेषराव अंभोरे, प्रांंत सदस्य अॅड. गजानन ठाकरे, जिल्हा प्रमुख धर्म प्रसार विजय मारोतराव पवार यांच्यासह २०० विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते साखरखेर्डा पोलिस ठाण्यात हजर होते. पुढील आठवड्यातील रविवारी पुन्हा असला प्रकार सुरू राहिल्यास संबंधित ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गोरेगाव फाट्यावरील प्रकाराबाबत पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करत आहेत, अशी माहिती साखखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे. तथापि, हे वृत्तलिहिपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नव्हते.
——————