– मंत्र्यांची यादी जवळपास फायनल
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. शाह यांनी या दोघांनाही भेटीची वेळ दिली असून, थोड्याच वेळात ही भेट अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात २५ मंत्र्यांना शपथ देण्याचे नियोजन आहे. त्यांची यादी फायनल झालेली आहे. शाह यांची मंजुरी मिळताच उद्या किंवा परवा शपथविधी होऊ शकतो. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बुलडाण्यातून संजय कुटे, गिरीश महाजन यांची नावे निश्चित असून, शिंदे गटातून अब्दुल सत्तार, डोंगर-झाडीफेम शहाजी पाटील यांची नावे या यादीत असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
शिवसेनेत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार व भाजप यांनी एकत्र येत, राज्यात सत्ता प्राप्त केली आहे. ३० जूनरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. परंतु, अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांची धाकधुक वाढली आहे. तीन आठवडे झाले तरी राज्याला मंत्रिमंडळ नसल्याने विरोधकही सरकारवर टीका करत आहेत. परंतु, राष्ट्रपती निवडणुकीला फटका बसू नये, म्हणून शिंदे-फडणवीस-शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला होता. तसेच, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचीही टांगती तलवार आहे. तरी महाराष्ट्राच्या ३६ जिल्हे, ३१ खाते, आणि ३० आयुक्तालये व २९ विभागांसाठी मंत्रिमंडळ नसल्याने राज्याचे कामकाज प्रभावित झालेले आहे.
फुटीर गटातून मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असून, मंत्रिपद मिळाले नाही तर ते पुन्हा मूळ शिवसेनेत परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मंत्रिपदे मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. तर भाजपमध्येही अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने संभाव्य मंत्र्यांची यादी शिंदे व फडणवीस यांनी तयार केली असून, या यादीवर चर्चा करण्यासाठी हे दोघेही आता नवी दिल्लीत पोहोचलेले आहेत. ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाह यांच्या अंतिम मंजुरीनंतर उद्या किंवा परवा, परंतु लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात कोण असावे, याबाबत रा. स्व. संघानेही काही निर्देश दिल्याची माहितीही कानावर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सरसंघचालकांची भेट घेतली होती. या भेटीत याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, संघाने या यादीवर नजर मारलेली आहे, असेही सूत्र म्हणाले.
—————-