बिबी (ऋषी दंदाले) – दिनांक १ जुलैपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा बिबी पोलीस ठाण्यात दिनांक १ जुलैरोजी नोंदविला गेला आहे. सर्व पोलीस ठाण्यात नव्या कायद्यानुसार एक जुलैपासून कामकाज सुरू करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा यांची जागा आता नव्या भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष कायदा यांनी घेतली आहे.
१ जुलैपासून घडणार्या गुन्ह्यांची नव्या कायद्यातील कलमे, तरतुदी यांची अमलबजावणी करून गुन्ह्याची नोंद करण्यात येत असल्याची माहिती बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी दिली. यावेळी लोणार तालुक्यातील बिबी पोलीस ठाण्यात धम्मपाल बाबुराव साळवे यांच्या तक्रारीवरून कलम ११८(१),११५, ३५२, ३ (५) भारतीय न्यायसंहितेनुसार बिबीत पहिला गुन्हा ठाणेदार संदीप पाटील यांच्या आदेशाने नोंदविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात येणारे नागरिक यांना आता नवीन कायद्याच्या तरतुदी समजावून सांगण्यात येत असून, गावांना भेटी देऊन नवीन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. देशातील फौजदारी कायद्यात नवीन कायद्यांमुळे आमूलाग्र बदल करणारे हे कायदे असून, न्याय व्यवस्थेत यामुळे अनेक बदल होणार आहेत. शून्य एफआयआर, ऑनलाइन तक्रार नोंदणी, इलेक्ट्रॉनिक मार्गाने समन्स बजावणी, गंभीर गुन्ह्यातील तपासात व्हिडिओग्राफी करणे असे अनेक महत्वपूर्ण बदल नवीन कायद्यात असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना पोलीसदल दिसणार आहे.