प्रा. नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकरांना डावलून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळेंनी घडवून आणला प्रतापरावांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार!
पुरूषोत्तम सांगळे
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व आपल्या संवेदनशील लेखनीतून सर्वसामान्यांच्या व्यथांना न्याय मिळवून देणारे विदर्भातील एका आघाडीच्या दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा स्वतंत्र प्रभार आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला. अतिशय देखण्या आणि प्रतापरावांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणार्या या सोहळ्याला शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, काँग्रेसचे राहुल बोंद्रे आदी नेत्यांना मात्र या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले नाही. लोकसभा निवडणुकीत तुपकर आणि खेडेकर यांनी प्रतापराव जाधवांवर जोरदार टीकास्त्र डागले होते. त्यामुळे हे दोन नेते या सोहळ्याला बोलावले गेले असते, तर एक चांगला सर्वसमावेश संदेश जिल्ह्यात गेला असता. आणि, निवडणुकीत निर्माण झालेली राजकीय कटुताही दूर झाली असती. परंतु, या नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी ही चांगली संधी गमावली.
मूळामध्ये राजकारणात हस्तक्षेप करणे, किंवा एकाद्या राजकीय नेत्याच्या फार जवळ जाणे, हे काही पत्रकारांचे काम नाही. उलट लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे, सत्तेच्याविरोधात आणि लोकांच्या बाजूने बोलण्यासाठी पत्रकारिता असते. लोकसभा निवडणुकीत जे राजेंद्र काळे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकरांबाबत कमालीची सहानुभूती दाखवताना दिसले, ते काल अचानक नरूभाऊंना टाळतानाही दिसून आलेत. खरे तर जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या प्रतापराव जाधव यांचा जिल्हा मुख्यालयी नागरी सत्कार सोहळा हा सर्वपक्षीय आणि खास करून प्रतापरावांच्या राजकीय विरोधकांना सोबत घेऊनच व्हायला हवा होता. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांत जो सामंजसपणा दिसतो, तो सामंजसपणा बुलढाण्यातील नेत्यांनाही यानिमित्ताने दाखवता आला असता. परंतु, या नागरी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आणि प्रमुख संयोजक असलेल्या ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी प्रा. नरेंद्र खेडेकर व रविकांत तुपकर यांना या कार्यक्रमाला बोलावलेच नाही. याबाबत काही पत्रकारांनी श्री काळे यांना विचारणा केली असता, त्यांनी खोटेच सांगितले, की आम्ही बोलावले होते, पण त्यांनी यायला नकार दिला. या सोहळ्याच्या निमित्ताने तुपकर आणि खेडेकर यांना नाहकच ‘व्हिलन’ ठरवण्याचा प्रकार झाला. वास्तविक पाहाता, तुपकर हे तरूण असले तरी समजदार नेतृत्व असून, वैयक्तिक प्रतापरावांबद्दल त्यांना कोणताही रागलोभ नाही. प्रा. खेडेकर आणि बुधवत हे तर प्रतापरावांचे जुने सहकारी आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनाही प्रतापरावांबद्दल वैयक्तिक आदरच आहे. मुळामध्ये पत्रकारांनी एक तर अशा नागरी सत्कार सोहळ्याचे पुढारपण घेऊ नये. किंवा, घेतलेच तर त्यात असा राजकीय अभिनिवेश ठेवू नये. राजेंद्र काळे यांनी एखाद्या सराईत राजकारण्यासारखे वागून या नागरी सत्कार सोहळ्यालाही राजकीय वळण कसे मिळेल, याची काळजी घेतली. वास्तविक पाहाता, राजेंद्र काळे हे पत्रकारितेतील ज्येष्ठ आणि अनुभवी असे व्यक्तिमत्व आहे. ते जिल्ह्यातील बहुजन समाजाचे लाडके पत्रकार आहेत. त्यांनी तुपकर आणि खेडेकर या नेत्यांना या सोहळ्याला बोलावले असते तर राजकीय विरोध बाजूला ठेवून, हे दोघेही आपल्या भूमिपुत्राच्या सत्काराला निश्चितच आले असते. आणि, अशा कार्यक्रमात प्रतापरावांचे कौतुकही त्यांच्या तोंडून झाले असते. या सोहळ्याच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हाच नाही तर राज्यात एक सकारात्मक संदेश गेला असता. ‘श्री काळेंनी एका चांगल्या संधीचे सोने करण्याऐवजी अक्षरशः माती केली’, अशा प्रतिक्रिया बुलढाण्यातून आता कानावर येत आहेत.
राजेंद्र काळे यांची काही राजकीय नेत्यांशी असलेल्या जवळीकबद्दल एका राजकीय नेत्याने तर फारच खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”आजकाल राजेंद्र काळे यांचा राजकीय वावर चांगलाच वाढला आहे. अनेकांचे ते ‘राजकीय सल्लागार’देखील झालेले आहेत. जे राजकारणी त्यांचा राजकीय सल्ला ऐकत नाही, त्यांच्याबद्दल त्यांची नाराजीही लेखणीतून उमटते. त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे, की यापुढे निवडणुका लढवायच्या असतील, किंवा काही राजकीय निर्णय घ्यायचा असेल, तर प्रथम राजेंद्र काळे साहेबांना विचारूनच तो घ्यायला पाहिजेत. आमच्या पक्षाच्या नेत्यांच्याआधी आता आम्ही काळेसाहेबांच्या घराचे दार गाठणार आहोत!” एकूणच काय तर, राजेंद्र काळे आता पत्रकारिता कमी आणि राजकीय नेत्यांचे मार्गदर्शक म्हणून जास्त काम करत आहेत. हे त्यांच्यासाठी चांगले असले तरी, पत्रकारितेत मात्र यानिमित्ताने नवा पायंडा पडत असून, तो बुलढाण्याच्या पत्रकारितेसाठी फारसा चांगला नाही.
———
पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार आणि छत्रपती उदयनराजे भोसले, राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यासारख्या नेत्यांचे कमालीचे राजकीय वितुष्ट आहे. परंतु, जेव्हा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असतो, आणि हे नेते एकत्र येतात, तेव्हा मात्र ते कोपरखळ्या मारत का होईना एकमेकांबद्दल चांगलेच बोलतात. स्व. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री आणि राजकीय वैरत्वाचे तर उदाहरणच वेगळे आहे. राजकारणात फारकाळ कुणी कुणाचा राजकीय विरोधक नसतो. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर व प्रतापराव जाधव यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. उद्या तुपकर हे भाजपात गेले किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले तर हे दोन्ही नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतील. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन करताना, पत्रकाराने तात्पुरत्या राजकीय विरोधावर लक्ष द्यायचे नसते. ही बाब राजेंद्र काळे यांच्यासारख्या ‘मोस्ट सीनिअर’ पत्रकाराच्या लक्षात कशी आली नाही? त्यामुळे प्रतापराव जाधवांच्या नागरी सत्कार सोहळ्यापासून तुपकर किंवा खेडेकर यांना दूर ठेवण्याचा त्यांनी केलेला कथित मुत्सद्दीपणा हा खरे तर त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी घोडचूक ठरली आहे. यापुढे तरी श्री काळे यांनी पत्रकारिता आणि राजकीय लुडबूड या दोन वेगवेगळ्या परस्परविरोधी बाबींची गफलत करू नये. एक तर ते कार्यरत असलेल्या दैनिकात चांगली पत्रकारिता तरी करावी, किंवा सरळ पत्रकारितेतून बाहेर पडून आता राजकारणात तरी उतरावे. त्यांच्या पाठीशी असलेला बहुजन समाज त्यांना निश्चितच वार्यावर सोडणार नाही, आणि त्यांचे मित्र असलेले राजकीय नेतेही त्यांना राजकीय आधार नक्कीच देतील. तसेही विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, एखाद्या राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन काळेसाहेब निवडणुकीच्या रिंगणात जरी उतरले तर ते आमदार निश्चितच होतील, असा फुकटचा सल्ला आम्ही त्यांना देत आहोत.
————