शिक्षणाने व्यक्तीचा सामाजिक, नैतिक, आर्थिक, बौद्धिक विकास होतो हे जाणूनच शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे केले – शिवव्याख्याते प्रमोद टाले
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षण हे मोफत व सक्तीचे केले होते. कारण, शाहू महाराज हे जाणून होते, की शिक्षणाने माणसाचा सामाजिक, नैतिक, आर्थिक, व्यावसायिक, बौद्धिक विकास होतो. आजही शिक्षणाची गंगा बहुजनांच्या आणखी दारापर्यंत जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक, शिवव्याख्याते प्रमोद टाले यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती बुलढाणा येथे मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद टाले बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अनिल अकाळ (माध्यमिक शिक्षणाधिकारी) हे होते. तर या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष शिवश्री रविकांत काळवाघे, राज्य सहसचिव शिवश्री डॉ. मनोहर तुपकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात शिवश्री टाले म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी अविरत लढा देणारे सर्वसामान्यातील एक असामान्य व्यक्तिमत्व होते. लोकशाहीची खरी संकल्पना महाराजांनी त्या काळामध्ये मांडली. शाहू महाराजांचे म्हणणे होते, की सामान्यातील सामान्य माणसालासुद्धा आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, आणि इतरांनीसुद्धा ते ऐकून घेतले पाहिजेत. सर्वांना शिक्षण मिळायला हवे आणि त्या काळामध्ये त्यांनी मुले व मुलीसाठी बोर्डिंगची व्यवस्था केली होती. सामान्य कुटुंबातील मुला- मुलींना शिक्षण मिळायला हवे, यासाठी शाहू महाराज अविरत झटत राहिले. त्याकाळी जे धर्मपंडित व त्यांची वर्चस्ववादी वागणूक होती, तिला छेद देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. महाराजांनी शिक्षण मोफत तर केलेच होते, पण ते सक्तीचेही केले होते. त्याकाळी मुले जर शाळेत आली नाही तर एक रुपयाच्या दंडाची शिक्षा महाराजांनी केली होती. त्यामागे त्यांचा एकच हेतू होता, दंड आकारल्यामुळे मुलं दररोज शाळेत येतील. शिक्षणाने माणसाचा सामाजिक, नैतिक, आर्थिक, व्यावसायिक, बौद्धिक विकास होतो, हे महाराजांनी त्याकाळी जाणले होते, म्हणून महाराज शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते, असेही याप्रसंगी शिवश्री टाले यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष अनिल अकाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, कार्याध्यक्ष रविकांत काळवाघे, राज्य सहसचिव डॉ. मनोहर तुपकर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे संपादकीय संचालक तथा देऊळगावराजा मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण मिसाळ, अॅड. सुधाकर दळवी, सुनील भुतेकर, पत्रकार गणेश उबरहंडे, श्रीकृष्ण गाढवे, शेख रफीक शेख याकुब, शेख अनिस शेख रज्जाक, विवेक तेजराव काळे, गजानन पडोळ, दत्तात्रय शेळके, शरद म्हस्के, अभय पाटील, संजय खांडवे, अॅड. पी. एम. जाधव, प्रभाकर काळवाघे, रवींद्र पडघान, सुरेश साबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन संजय खोडवे सर यांनी केले.
———-