Chikhali

सतीश पवार यांची भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – अवघ्या वर्षभरात राजकारणात दमदार ‘एण्ट्री’ करत आपल्या कार्याची छाप जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटविणारे सतीश पवार यांच्या कार्याची दखल भीम आर्मीने घेतली आहे. सतीश पवार यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. झोकून देऊन पक्षकार्य केले, पण ‘वंचित’ने फारशी दखल न घेतल्याने युवा जिल्हाध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला. आता मात्र भीम आर्मीने ताकदीने लढण्याचे बळ दिल्याने पदाला न्याय देण्यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम झटत राहणार आणि संघटनही मजबूत करणार, अशी ग्वाही सतीश पवार यांनी नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया देताना दिली.

खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी सतीश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकारणात येण्यापूर्वी पवार सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच मूकनायक फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी चळवळीचे कार्य सुरू ठेवले. विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. भीम आर्मीचे संस्थापक ॲड. चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभेवर दीड लाखाच्या मतधिक्क्याने निवडून आले. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सामाजिक प्रश्न सोडविण्यासोबतच जनतेच्या समस्या आक्रमकपणे लढून निकाली काढण्यात सतीश पवार यशस्वी झाले. पवार यांनी नुकतीच मुंबईत भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या आक्रमक संघटनेत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भीम आर्मीचे राज्यातील प्रमुख नेते राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, सीताराम गंगावणे, सुनील थोरात, सुनील गायकवाड, कोअर कमिटीचे राजू झनके, बाबा रामटेके, जासंग बोपेगावकर, मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पवार यांच्यावर बुलडाणा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!