– नागपूरचे अंतरही मोठे, व आर्थिक ताणही; शारीरिक, मानसिक दमछाक वेगळीच!
बुलढाणा (संजय निकाळजे) – वर्हाड प्रांत म्हणून ओळखल्या जाणार्या बुलढाणा-अकोला-वाशिम या जिल्ह्यासाठी असणारा लेखापरीक्षण विभाग (राज्य सेवाकर कार्यालय) नागपूर येथे नेण्यात आला असून, संबंधित कर्मचार्यांना नागपूर लेखा परीक्षण विभागात स्थायी स्वरूपात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग व शासकीय कर्मचार्यांना अतिरिक्त कारभार आणि गैरसोईचे काम होणार आहे. तसेच, नागपूरचे अंतर हे जास्त असल्याने व्यापारीवर्गाची प्रचंड परवड होणार असून, मानसिक, शारीरिक व आर्थिक परवड होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून राज्य जीएसटी विभागाची पुनर्रचना अपेक्षित होती. व्यापारीवर्ग व कर सल्लागार यांना कार्यालयीन कामकाज अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा होती. अकोला जिल्ह्याचा महसूल व संलग्न जिल्ह्याचे भौगोलिक अंतर पाहता अपीलिय अधिकारी व राज्यकर सह आयुक्त यांचे कार्यालय अकोला येथे असावे, अशी व्यापारी वर्गाची अपेक्षा होती. २१ मे २०२४ रोजी राज्य जीएसटी आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, व्यापारी व करदात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आदेशानुसार अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यासाठी लेखापरीक्षण विभाग नागपूर येथे देण्यात आला आहे. बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचे अकोला जिल्ह्यापेक्षा नागपूर जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. नागपूरला जाणे- येणे त्रासदायक व खर्चिक होऊ शकते. सांगायचेच झाल्यास बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा ते नागपूर अंतर ३७६ किलोमीटर आहे. ज्यामुळे एका दिवसात जाणे- येणे शक्य नाही. तसेच थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व्यापार्यांना वही खाते नागपूरला नेणे हे अत्यंत गैरसोईचे ठरेल.
अकोला जिल्ह्यात लेखा परीक्षण विभाग दिल्यास ही समस्या सोडविता येईल. अकोला येथील राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयाची स्वतःची वास्तू महामार्गावर स्थित आहे. आणि मुबलक जागा आहे. त्यामुळे येथे लेखापरीक्षण विभाग स्थापन करणे उपयुक्त व सोयीचे होईल. व्यापारी वर्ग विना तक्रार शासकीय कराची वसुली करतो, वही खाते ठेवतो व रिटर्न्स भरतो परंतु फक्त लेखापरीक्षणासाठी व्यापार्यांना इतक्या लांब जाणे, येणे करावे लागेल. व त्याचा आर्थिक मृदंड सहन करणे अन्यायकारक आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य विभागाचा लेखापरीक्षण विभाग अकोला येथे स्थापन करण्यात यावा, यासाठी विदर्भ चेंबरने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे समजते.
नागपूर नको, अकोला हवे!
वस्तू व सेवाकर लागू झाल्यापासून छोटे व्यापारी जीएसटी कार्यालयाच्या अखत्यारीत आले आहेत. लेखा परीक्षणासाठी सतत नागपूरला जाणे हे वेळ व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. लेखापरीक्षण अकोल्यात असल्यास छोटे व्यापारीसाठी सोयीचे व कमी खर्चिक ठरेल. राज्य शासनाने विकेंद्रीकरण धोरणानुसार लेखापरीक्षण नागपूर परीक्षेत्रात केंद्रित न करता अकोल्यात करणे न्यायोचीत राहील.
———