शेषशायी विष्णूमूर्तीची स्थापना करून भव्य मंदिर उभारण्याची परवानगी द्या!
– श्रीहरी विष्णू हे वारकरी संप्रदायाचे दैवत, वस्तूसंग्राहलयात मूर्ती न ठेवता मंदीर बांधू द्या!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी उत्खनन करतांना सापडलेली श्री शेषशायी भगवान विष्णूच्या मूर्तीचे अन्यत्र कोठेही स्थलांतर न करता, सिंदखेडराजा येथेच मूर्तीची योग्य ती शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा करून भव्यदिव्य मंदिर उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य वारकरी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी खोदकाम करताना शेषशायी भगवान विष्णू यांची मूर्ती आढळून आली आहे. या मूर्तीमुळे सिंदखेडराजा नगरीचा इतिहास हा किती जुना आहे, याची ओळख पटते. मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतच भव्य मंदिर उभारण्याची आणि मूर्ती स्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी वारकरी महामंडळ पुढाकार घेत असून, शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी महासंघाचे -विदर्भ अध्यक्ष ह.भ. प.राजेंद्र महाराज तळेकर, जिल्हा अध्यक्ष दामुअण्णा शिंगणे, शिवाजी महाराज काळुसे, पंजाबराव महाराज बिल्लारी, अमोलानंद महाराज सातव, किरण महाराज शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या अनेकांनी केली आहे.
सिंदखेडराजा या ऐतिहासिकस्थळी उत्खनन करतांना सापडलेली सुबक व सुंदर अशी मूर्ती इतरत्र न हलवता ही मूर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथेच ठेवण्यात यावी. सदर मूर्ती ही वस्तू नसून, इथल्या भारतीय परंपरेचे दैवत आहे. त्यामुळे तिला वस्तू म्हणून वस्तू संग्रहालयामध्ये न ठेवता भव्य दिव्य मंदिर उभारून मंदिरात या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी. या मंदिर बांधकामासाठी येणारा सर्व खर्च करण्यास आम्ही सर्व वारकरी बंधू भगिनीसह भगवान विष्णूवर श्रध्दा ठेवणारा भक्तगण या सर्वांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य मंदिर उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय गायकवाड, जिल्हाधिकारी बुलढाणा, पुरातत्व विभाग सिंदखेडराजा व नागपूर यांना पाठविल्या आहेत.
—-