दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वडगावमाळी येथे अवैध दारू विक्री होत असून, त्यामुळे येथील ग्रामपंचायत व महिलांनी बुधवारी (दि.२६) जिल्हा उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, १ जुलैपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या गावातील अवैध दारूविक्रीने साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे पितळ उघडे पडले आहे.
निवेदनात नमूद आहे, की गावातील अवैध दारूविक्री जोमात सुरू असून, चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात चार टपरीतून ही दारूविक्री केली जाते. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी जाऊन आपले सुखी जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. अनेक कुटुंबही उद्ध्वस्त होत आहेत. तरुणपिढी व्यसनाकडे वळली आहे. त्यामुळे याचे दुष्परिणाम लहान मुलावर होत आहे. गावात भांडणाचे प्रमाण वाढले आहे. या अगोदरही दारूबंदीसाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशन व संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले. परंतु आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई दारूविक्रेत्यावर करण्यात आली नाही. उलट जोमाने दारूविक्री गावात सुरू आहे. ही दारूविक्री बंद करण्यात यावी, यासाठी वडगाव माळी येथील महिला एक जुलैपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गावातील दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत वडगाव माळी, सावंगीमाळी सरपंच दत्ता गवई, ग्रामपंचायत सदस्य संगीता गवई, आरती गवई, आम्रपाली गवई, सुमित्रा गवई, निर्मला जाधव, भाग्यश्री राऊत, सरला रोही, शिवानी रोही, अनिता लष्कर, रुक्मिणी जाधव यांच्यासह अनेक महिलांनी उत्पादन शुल्क अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष जाऊन निवेदन सादर केले आहे.
————