ChikhaliVidharbha

खोटेदस्तावेज तयार करून शासनाला फसवले, जमीन हडपली, प्लॉट पाडून विकले!

– चिखली-जाफ्राबाद रोडवर खबुतरेंकडून प्लॉट घेणारेही अडचणीत, पैसेही अडकले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक करत चिखली नगरपालिकेकडून विकास परवानगी व चिखली तहसीलदारांकडून सनद प्राप्त करत त्याआधारे भूखंडाची विक्री केली. खोट्या दस्तावेजाच्या सहाय्याने विविध शासकीय कार्यालयांना फसविणार्‍या भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना सतिश खबुतरे (रा.चिखली) यांच्याविरूद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखलीमधील सर्व्हे क्रमांक १२०/२ मध्ये खबुतरे यांच्या मालकीची ८१ आर जमीन असताना त्यांनी शेजारील ०.०७.५० हेक्टर आर जमीनदेखील स्वमालकीची दाखविण्यासाठी हे खोटे दस्तावेज तयार केले होते.

सविस्तर असे, की चिखली भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या अर्चना सतिश खबुतरे यांची चिखली-जाप्रâाबाद रोडवर असलेल्या बुद्धविहार समोर सर्व्हे क्रमांक १२०/२ मध्ये ८१ आर म्हणजे जवळपास दोन एकर जमीन आहे. असे असतानादेखील त्यांनी शेजारील ०.०७.५० हेक्टर आर जमीन स्वतःच्या मालकीची दाखवण्यासाठी खासगी स्थापत्य अभियंत्याकडून खोटा नकाशा तयार करून घेतला. हा खोटा नकाशा पुढे भूमिअभिलेख कार्यालयात सादर करून, तो खरा असल्याचे भासवले. भूमिअभिलेख कार्यालयानेदेखील या नकाशाची शहानिशा न करता, ०.०७.५० हेक्टर आरचे क्षेत्र अधिक असल्याचा खबुतरे यांच्या मालकीच्या शेतजमिनीचा नकाशा तयार करून व मान्यता देऊन खबुतरे यांना दिला. त्या नकाशाचा वापर करून खबुतरे यांनी नगरपरिषद चिखली यांच्याकडून विकास परवानगी प्राप्त केली व चिखली तहसील कार्यालयाकडून सनद प्राप्त केली आहे. त्याआधारे अकृषक झालेल्या या शेतजमिनीचे भूखंड (प्लॉट) पाडून हे भूखंड अनेक लोकांना विक्री केले. आरोपी अर्चना खबुतरे यांनी शासकीय कार्यालयांसह अनेक लोकांची २७ फेब्रुवारी २०१९ ते २५ जून २०२४ या कालावधीत फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात चिखली नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता नीलेश तेजराव इंगळे (वय ४३ वर्षे) यांनी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या ४८४ (२४), ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निखील निर्मळ हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!