– शिक्षण व संगतीमुळेच जीवनात परिवर्तन – विजय अंभोरे
– अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचा परिवर्तन मेळावा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मेहकर विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे चालत असलेले विशिष्ट लोकांचे राजकारण, दादागिरी तसेच गरिबांचे शोषण याला जनता कंटाळली आहे, असा गंभीर आरोप करत, यातून मुक्त होण्यासाठी येणार्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी, या परिवर्तन मेळाव्यातून मेहकर विधानसभेत परिवर्तनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा बाळापूरचे आ. नितीन देशमुख यांनी केले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपविषयी शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष आहे. पाना या चिन्हाला दोन लाखाचे वर पडलेली मते ही विशेषतः शेतकर्यांची मते आहेत. ही मते महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांना कसे मिळतील, हे पटवून देण्यासाठी आम्ही कमी पडलो, अशी कबुलीही आ. देशमुख यांनी यावेळी दिली. तर जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणासोबतच समाज व चांगली संगतही आवश्यक आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांनी भाषणातून सांगितले. ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांची संगत लाभल्याने जीवनाचे सोने झाले, असेही अंभोरे यावेळी म्हणाले. परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून विजय अंभोरे यांची मेहकर विधानसभा लढण्याची इच्छा उजागर झाल्याचे यावेळी मान्यवरांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवले.
मेहकर येथील केजीएन हॉल येथे विजय अंभोरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल, २५ जूनरोजी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आ. नितीन देशमुख तर सत्कारमूर्ती म्हणून विजय अंभोरे यावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष कासम गवळी होते. यावेळी शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, प्रदेश महिला काँग्रेस सचिव नंदिनी टारपे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, शिवसेना (ठाकरे) जिल्हा उपप्रमुख प्रा.आशीष राहाटे, महिला आघाडी प्रमुख जिजाताई राठोड, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, काँग्रेस तालुका अध्यक्ष देवानंद पवार, अशोकभैया जयस्वाल, प्रा. नीलेश गावंडे, प्रमोददादा अवसरमोल, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, ज्येष्ठ नेते शंकरराव सपकाळ, माजी सभापती विजय काटोले, संताराम तायडे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप खरात, रोहयो माजी तालुकाध्यक्ष प्रमोद देशमुख, यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे यांनी आम्ही अनेकांना मोठे केले पण ते आम्हाला सोडून गेल्याची खंत भाषणातून व्यक्त केली. प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले की, एक पराभव जीवनातील अंतिम पराभव नसतो. त्यामुळे आपण पुन्हा जोमाने कामाला लागलो असून, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले. कासम गवळी यांनी मेहकरातील काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्याने लोकसभा निवडणुकीत ‘पाना’ फिरविल्याचा गंभीर आरोप नाव न घेता, आपल्या भाषणातून श्याम उमाळकर यांच्यावर केला. यावेळी प्रा.नीलेश गावंडे, संताराम तायडेसह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विधानसभा संघटक प्रा.गणेश बोचरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने विजय अंभोरे यांची मेहकर विधानसभेच्या आखाड्यात एण्ट्री होणार असल्याचे मान्यवरांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवले. तशी चर्चादेखील यावेळी ऐकावयास मिळाली.