– डॉ. राजेंद्र शिंगणे, दिलीप वळसे पाटील, संग्राम जगताप यांच्यासाठी दारे खुली?; तर धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना परतीचे दोर कापले!
मुंबई (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक आमदारांना विधानसभेच्या तोंडावर घरवापसीचे वेध लागलेले आहेत. तसे, संकेतही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेले आहेत. परंतु, सरसकट सर्वांना परत घेतले जाणार नसून, ज्यांनी पक्षाचे नुकसान केले नाही, अशाच नेत्यांसाठी शरद पवारांची दारे खुले आहेत. विशेष करून, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, दिलीप वळसे पाटील आदींना दारे खुली आहेत, तर मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र दारे बंद आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने खासगीत बोलताना दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजितदादा पवारांच्या बंडखोरीनंतर सुरूवातीला हा शरद पवारांचाच राजकीय डाव असावा, अशा राज्यातील बहुतांश जनतेचा विचार होता. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्यातील पराकोटीचा संघर्ष पुढे आला. या निवडणुकीत जनतेचे अजित पवार यांचे नेतृत्व नाकारून शरद पवार यांच्याच नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले. त्यामुळे अजितदादांसोबत गेलेले आमदार सद्या अस्वस्थ आहेत. त्यापैकी अनेकजण हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून, यापैकी अनेकांचे आमदारनिधी अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अडकलेले आहेत. आमदार निधीच्या फाईलीवर स्वतः फडणवीस हे शेवटचा हात फिरवत आहेत. त्यामुळे अनेक आमदारांनी सद्या मौन बाळगलेले आहे. परंतु, आमदार निधी प्राप्त झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना हे आमदार आपल्या विजयाची खात्री पाहून शरद पवार की अजित पवार यापैकी एकाचे नेतृत्व मान्य करणार आहेत.
अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीबाबत रोहित पवार हे काहीही बोलत असले तरी, जे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, त्याची नावे मात्र गोपनीय आहेत. सरसकट सर्वांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नसून, शरद पवार म्हणतील तेच आमदार पुन्हा पक्षात घेतले जाणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्याबद्दल शरद पवार यांचे मत नकारात्मक आहे. तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल मात्र शरद पवार हे आशावादी आहेत, असे या राजकीय सूत्राचे म्हणणे आहे. कोण शरद पवारांकडे परत येणार, व कोण अजितदादांकडे थांबणार, हे चित्र आता थेट निवडणुकीच्या आखाड्यातच स्पष्ट होणार आहे.
————