भाजपचे ओम बिर्ला ध्वनीमताने लोकसभेचे अध्यक्ष
– ममता बॅनर्जींनी यूपीएचे गणित बिघडवले; विरोधी पक्षाची मतदानाची मागणी हंगामी अध्यक्षांनी फेटाळली
– जनतेचा आवाज संसदेत उठविण्यापासून रोखू नका, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – भारतीय जनता पक्षाचे खासदार व माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. लोकसभेत झालेल्या आवाजी मतदानाने ते निवडून आले. ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या मतांचे गणित बिघडवल्याने, तसेच हंगामी अध्यक्षांनी मतदान न घेता ध्वनीमत घेतल्याने बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेत, त्यांना शुभेच्छा दिल्यात. नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. तर ‘यूपीए’कडून कोडिकुन्निल सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. बिर्ला यांच्या नावाला राजनाथ सिंह, शिवराज सिंह, अमित शाह आदी नेत्यांनी अनुमोदन दिले होते. आवाजी मतदानात ‘यूपीए’चा प्रस्ताव बारगळला.
लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते तथा ‘यूपीए’चे नेते राहुल गांधी व पंतप्रधान तथा एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. बलराम जाखड यांच्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसर्यांदा निवड होणारे आपण पहिलेच अध्यक्ष आहात, असे सांगून मोदी यांनी आपला अनुभव पुढील पाच वर्षे आम्हाला मार्गदर्शन करत राहील, असे मोदी म्हणालेत. तर राहुल गांधी म्हणाले, की लोकसभा सभागृह हे देशातील लोकांचा आवाज असते. सरकारकडे राजकीय ताकद असली तरी विरोधी पक्षाकडे लोकांचा आवाज असतो. आपल्या कामातून लोकांचा आपल्यावरील विश्वास कायम रहावा. आम्हाला विश्वास आहे की, लोकांचा आवाज सभागृहात उठविण्यासाठी तुम्ही निश्चितच आम्हाला पुरेपूर संधी द्याल, असे राहुल गांधी यांनी सांगून, लोकांचा आवाज संसदेत दाबला जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील आपल्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. आम्हाला विश्वास आहे, की आपण विरोधी पक्षात असलेल्या आमचा आवाज दाबणार नाही, तसेच वारंवार आमच्यावर निलंबनाची कारवाईही करणार नाहीत. सत्ताधारी आणि विरोध यांना आपण समान वागणूक द्याल, अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.
———–राहुल गांधी विरोधी पक्षनेते
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)नेते खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात आता राहुल गांधी-नरेंद्र मोदी असा जोरदार सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वी गेली दहा वर्षे राहुल गांधी हे एकटेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या धोरणावर कठोर भूमिका घेत सडेतोड टीका करत आहेत. आता लोकसभेत मोदींना राहुल गांधी यांच्या आक्रमक, अभ्यासू व कणखर भूमिकेला सामोरे जावे लागणार आहे.