Breaking newsHead linesMaharashtra

पीककर्ज देताना बॅंकांनी शेतकऱ्यांना ‘सी-बिल’ची अट घातली तर FIR दाखल करणार!

– शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपातील बॅंकांच्या उदासिनतेबाबत व्यक्त केली चिंता!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज घेताना बॅंकाकडून सी-बिलची अट घातली जात असल्याचे पाहायला मिळत आहे, यासंदर्भात स्टेट बॅंकर्स कमिटीसोबत आमची बैठक झाली असून, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, की अशी अट घातली जाणार नाही. परंतु, जर ग्राऊंडलेव्हलवर तशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर आम्ही बॅंकांवर एफआयआर दाखल करू, अशी ताकीद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तसेच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यापूर्वीच स्टेट बॅंकर्स कमिटीची दोन वेळा बैठक झालेली आहे. तर आज मीदेखील त्यासंदर्भातील बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य वेळी बियाणे, खतांची उपलब्धता मिळाली. खरीपपूर्व जी बैठक झाली. त्यात बियाण्यांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, नॅनो युरीया वापरला जावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबीच दिली. शेतकऱ्यांकडे सीबील मागितले तर एफआयआर दाखल करणारच, असा इशारा देताना तसे झाल्यास आमच्याकडे येऊ नका, असे फडणवीस यांनी ठणकावले. गेल्यावेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे. गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
——
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरूनदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणावरून विनाकारण राजकारण करू नये, मलादेखील या प्रकरणात राजकारण करायचे नाही. हा विषय राजकारणापलिकडचा असून, आपल्या युवकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. मुळात जे मविआचे नेते आरोप करत आहेत. त्यांच्या राज्याध्ये पोलिस विभागाचे धिंडवडे निघाले. शंभर शंभर कोटींच्या वसुली केली गेली. पण आम्ही झीरो टॉलरन्स पॉलिसी ठरवली असून, जो कोणी सापडेल त्यात पोलिस असो की हॉटेलवाला असू त्यांच्यावर कारवाई होईल. राज्य सरकारने कठोर भूमिका घेतलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष कारवाई करत आहोत, आणि येत्या काळात ती कारवाई सातत्याने चालूच राहणार आहे, असा विश्वासदेखील फडणवीस यांनी व्यक्त केला.
————–

https://x.com/i/broadcasts/1jMJgmBvBZMKL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!