पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घाट!
– राजेंद्र शिंगणे, पंकजा मुंडे-पालवे यांचीही राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा!
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी मुंबईत सुरू आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीवारी केल्याचे सांगण्यात येत आहे. बुलढाण्यातून संजय कुटे, छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट व नगरमधून राम शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली. तर काहींनी अजित पवार गटात गेलेले राजेंद्र शिंगणे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे सांगितले आहे. जागा कमी व इच्छूक जास्त असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत मौन बाळगले आहे.
गुरूवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी आणि महायुती सरकारच्या शेवटचे अधिवेशन सुरू होत आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अचानक दिल्लीवारी केली व मंत्रिमंडळ विस्ताराची अनुमती मिळाल्याची चर्चा आहे. येत्या २६ तारखेला अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सकाळी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या शक्यतेला शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. विस्तार झाला पाहिजे, असे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे मत आहे. येत्या दोन दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे; पण इच्छुक अधिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत गोपनियता पाळत असावेत, असे शिरसाट यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या बरोबरच आशिष शेलार, राम शिंदे, संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, रमेश बोरनारे यांची नावं चर्चेत आहेत. अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे व सध्या शरद पवार यांच्या सोबत असलेल्या माजी मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. विस्तार करताना अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वगळले जाणार, अशी कुजबूज गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
————
येत्या ३ ते ४ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक असल्याचा महायुतीतील नेत्यांचा आग्रह आहे. विशेषत: शिंदे आणि अजितदादा गटाला विस्तार हवा आहे. अजित पवार हे त्यांच्या आमदारांसह २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकावा, अशी मागणी सरकार पक्षामधील आमदारांमधून होत आहे. गुरूवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
————-