पाऊस रूसला, पेरण्या लांबल्या; हिवरा आश्रम परिसरावर दुष्काळाचे ढग दाटले!
हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – जिल्हयात सर्व ठिकाणी पावसाचे आगमन झाल्यामुळे पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र हिवरा आश्रम परिसरातील दुधा, ब्रम्हपूरी, हिवरा बुद्रूक, पेनटाकळी, शिवाजी नगर, पोखरी या गावात पेरण्या झाल्या नसून, शेतात ढेकळंच दिसून येत आहे. हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी दररोज पावसाची वाट पाहत असून, पाऊस मात्र येत नसल्यामुळे तो चिंतेत पडला आहे. तसेच, ज्या काही शेतकर्यांनी थोड्याफार पेरण्या केल्या होत्या, त्याच्यावर आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पाऊस रूसल्याने संतनगरी असलेल्या हिवरा आश्रम परिसरावर दुष्काळाचे चांगलेच ढग दाटून आलेले आहेत.
हिवरा आश्रम परिसरातील शेतकर्यांच्या नजरा सद्या आभाळाकडे लागून आहेत. पेरण्या न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, पावसाळा सुरू होवून पंधरा ते वीस दिवस होवूनसुध्दा या परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हीच जर परिस्थिती राहिली तर शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट येवू शकते. तसेच चोरी, दरोडे यांचे प्रमाणसुध्दा वाढू शकते. पाऊस नसल्यामुळे आता शेतकर्याच्या डोळयात पाणी आले आहे. शेतातील नागरटी केलेले मोठ मोठे ढेकळं अद्यापसुध्दा शेतात तसेच कायम असल्यामुळे आता पाऊस तरी कधी येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. खरिपाची पेरणी लांबल्यामुळे शेतकरीवर्ग दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, मात्र तो नेहमीच संकटात सापडलेला असतो. कधी अतिपावसाच्या तर कधी दुष्काळाचे संकट त्याचा पाठलाग करीत असल्याचे दिसून येत आहे. आता पाऊस आला तर हिवरा आश्रम परिसरातील पेरण्या होतील व सर्व शिवारं हिरवे दिसू लागतील. आता हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी देवाकडे पाऊस येण्यासाठी साकडे घालत आहे.