वर्हाडी चहा पिण्यासाठी खाली उतरले अन् ट्रॅव्हल बस धडधड पेटली!
– नवरदेव, नवरी गाडीतच असताना पेटली बस, ४८ प्रवासी बालंबाल बचावले!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चंद्रपूर येथून लग्नाचे वर्हाड घेऊन आलेली ट्रॅव्हल बस मेहकर फाटा येथे चहा घेण्यासाठी थांबली. प्रवासी खाली उतरताच अचानक या बसने पेट घेतला. काही कळायच्याआत ही बस धडधड पेटली. सुदैवाने सर्वच्या सर्व ४८ प्रवासी बचावले असून, बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ही थरारक दुर्देवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज (दि.२५) पहाचे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव व मदतकार्य केले. आग लागली तेव्हा बसमध्ये नवरदेव व नवरीसह काही प्रवासीही होते. त्यांनी तातडीने बाहेर पडून आपला जीव वाचला. ही बस चहा घ्यायला थांबली नसती तर मात्र दुर्देवीने मोठी दुर्घटना घडू शकली असती.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथून लग्नाचे वर्हाड घेऊन ही खाजगी बस बुलढाण्याकडे येत होती. मेहकर फाटा येथे बस आली असता, काही प्रवासी चहा घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी बसमध्ये अचानक शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे क्षणार्धात बसला आग लागून मोठा भडका उडाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी बाहेर पडून कसाबसा आपला जीव वाचवला. संपूर्ण बस धाडधाड जाळून खाक झाली. या बसमधून ४८ वर्हाडी प्रवास करीत होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व वर्हाडी या घटनेतून सुखरूपणे बचावले आहेत. मात्र वर्हाडी मंडळींच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी बाहेर पडून कसाबसा आपला जीव वाचवला, त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. भररस्त्यातच बसने पेट घेतल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
तर विलास राठोड या बसच्या चालकाने सांगितले, की मेहकर फाट्यावरील पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरले. गाडी चालू करताच वायरिंग झाळाल्याचा वास येवू लागला. हे लक्षात येताच गाडीतील सर्व वऱ्हाडी मंडळी खाली उतरविले असता, काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. त्यामध्ये लक्झरी बसचा कोळसा झाला. बस चालक विलास राठोड यांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.
——
बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरवरुन वर्हाड घेऊन ही खासगी बस सोमवारी बुलढाणा येथे लग्नासाठी येत होती. या बसमध्ये तब्बल ४८ प्रवासी प्रवास करत होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे ४ वाजेच्या सुमारास बस चिखलीस्थित मेहकर फाटा येथे पोहोचल्यावर या ठिकाणी चहापाणी घेण्यासाठी बस थांबली होती. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसमधून उतरले होते. तर काही प्रवासी बसमध्ये झोपलेले होते. याच दरम्यान बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधून उतरलेल्या प्रवासींनी बसमध्ये झोपलेल्या सर्वाना खाली उतरविले, यामुळे मोठा धोका टाळला असला तरी, बसने अवघ्या काही वेळातच मोठा पेट घेतल्याने काही क्षणात या बसचा कोळसा झाला. घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले; मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सदर खाजगी बस बुलडाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. या घटनेत वर्हाडी, चालक, वाहक आदी सर्वजण सुखरूप बचावल्याने जीवितहानी टळली असली तरी बससह वर्हाडींचे सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झालेली आहे.
—-