– कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्ग शेतकरीरेट्यामुळे स्थगित केला; मग भक्तीमहामार्ग शेतकर्यांवर का लादत आहात? : सरनाईक यांचा जळजळीत सवाल
चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा जिल्ह्यातील ४३ गावांमधून जाणारा भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकर्यांकडून सतत आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील शेतकरीरेट्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी बैठक घेत, शक्तीपीठ महामार्गाचे अधिग्रहण थांबवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांना विचारात घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशा सूचना व आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात बैठकीदरम्यान दिले होते. याच शक्तीपीठ महामार्गाच्या स्थगितीचा आधार घेत, या महामार्गाप्रमाणेच भक्ती महामार्गालासुद्धा स्थगिती देण्यात यावी, शेतकर्यांची आंदोलने व शासनाप्रती रोष बघता भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. यासाठी बैठक घेत निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी अर्थसंकल्पात घोषणा झाली होती. हा भक्तीमार्ग सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव या तालुक्यांतील ४३ गावांतून जात असून, या गावातील शेतकर्यांची सुपिक व कसदार जमीन अधिग्रहीत करण्यात येत आहे. या बाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भक्ती महामार्गामध्ये व शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकर्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. ज्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्गासाठीच्या जमिनी अधिग्रहणांस कोल्हापुरातील शेतकर्यांनी विरोध दर्शविला व आंदोलने केली, त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरीसुध्दा आंदोलने करून या भक्ती महामार्गास विरोध दर्शवित आहेत. नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्गाचे जमीन अधिग्रहणांस शेतकर्यांनी दर्शविलेला विरोध व केलेली आंदोलने याची दखल घेऊन व शेतकर्यांच्या भावनांचा आदर करून शासनाने शक्तीपीठ महामार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावून जमीन अधिग्रहण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावीत भक्ती महामार्गास शेतकर्यांचा असलेला विरोध लक्षात घेता, यावर तोडगा काढण्यासाठी शेतकर्यांची बैठक बोलाविण्यात यावी, व शेतकर्यांच्या जमिनीचे अधिग्रहण थांबविण्यात यावे, शक्तीपीठ महामार्गाच्या धर्तीवर भक्ती मार्ग रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी मुंबई मंत्रालय येथे मंगळवारी (दि.२५) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
शक्तीपीठ महामार्गास स्थगिती तर भक्ती महामार्गाला का नाही, शेतकर्यांनी आंदोलनेच करावीत का?
शासनाने शेतकर्यांना विचारात न घेता राज्यामध्ये विविध महामार्ग मंजूर केले आहे. शक्तीपीठ महामार्ग असेल, भक्ती महामार्ग असेल, याचे जमीन अधिग्रहणदेखील सुरु केले आहे. शेतकरी सतत जीवघेणे आंदोलने करीत आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर येथे शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढल्यानंतर शासनस्तरावर बैठक घेत शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्यात आली. शेतकर्यांना विचारात घेऊनच निर्णय घेऊ, असे शासन म्हणत आहे. तसे आश्वासन बैठकीदरम्यान दिले गेले. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांनीसुद्धा आता भव्य मोर्चा आणि आंदोलने केल्यानंतरच शासनकर्ते व मंत्र्यांना जाग येणार का? असा संतप्त सवाल विनायक सरनाईक यांनी केला आहे.