– ‘एक तास स्वच्छते’साठी उपक्रम ठरला परिणामकारक!
बिबी (ऋषी दंदाले) – आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते व स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे यांच्या पुढाकारातून किनगावजट्टू येथील स्मशानभूमीचा कायापालट झाला असून, मानवी जीवनातील अखेरचा प्रवासदेखील या दोन युवा नेतृत्वानी सुखकर करून दिला आहे. हागणदारी ते नंदनवन असा या स्मशानभूमीचा प्रवास या दोघांनी ग्रामपंचायतचे सहकार्य तसेच लोकसहभागातून पूर्ण केला आहे. विनोद सातपुते हे आदर्श ग्रामसेवक म्हणून ओळखले जातात. प्रामाणिक व शिस्तबद्ध काम आणि लोकप्रिया या जोरावर त्यांनी यापूर्वी अनेक शासकीय योजना यशस्वी केलेल्या आहेत.
किनगाव जट्टू येथील खापरखेड रोडवरील देवीच्या मंदिराजवळील स्मशानभूमी म्हणजे हागणदारीची जागा झाली होती. परंतु किनगावजट्टू येथील स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे, आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते या दोन युवकांनी पुढाकार घेऊन, आपल्या जन्मभूमीतील स्मशानभूमीसाठी एक तास स्वच्छतेसाठी देऊन सातत्याने प्रयत्न करीत असल्यामुळे, बघता बघता स्वच्छतेचे खूप मोठे काम झाले आहे. आजरोजी सदर स्मशानभूमीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असून, स्मशानभूमीकडे लोक एका वेगळ्या नजरेने बघत आहेत. आपल्या गावाची स्मशानभूमी सुंदर व्हावी म्हणून, लोकांचा सहभागसुद्धा, वाढलेला आहे आणि रक्षाविसर्जनाच्या व अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना बसण्याची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून, लोकसहभागातून २५ बेंचेस बसविण्यात येत आहेत. यासाठी सर्व गावकरी सहकार्य करीत आहेत. एकंदरीतच स्मशानभूमीचे रूप बदलत आहे. शासनाचा पुढाकार म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने स्मशानभूमीचे शेड बांधकामसुद्धा जोरात सुरू आहे. शासनाचा पुढाकार व लोकांचा सहभाग, यामुळे स्मशानभूमी एक नंदनवन बनत आहे, यासाठी राजेश नागरे व विनोद सातपुते येथे परिश्रम घेत आहेत.
——
या हागणदारीतील स्मशानभूमीचे नंदनवन करण्यासाठी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम चांगलाच परिणामकारक ठरला. या उपक्रमांतर्गत खापरखेड रोडवरील स्मशानभूमीमध्ये स्वतःच्या खर्चाने स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे यांनी तननाशक फवारून घेतले, त्यावेळी चेतन वायाळकर, राजाराम भाऊ तांबे, विनोद सातपुते यांनी फवारणीसाठी सहकार्य केले.