बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची, तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद पडलेली रक्त-लघवी तपासणीची मशीन तात्काळ नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आठ दिवसांत सुविधा न मिळाल्यास या ग्रामीण रूग्णालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बिबी येथील ग्रामीण रुग्णालय हे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे ३० खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये तीन अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एक अधिकारी हे कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे, तर दुसरे एक अधिकारी हे बिबी येथे कार्यरत असताना ते येथे उपस्थित न राहता खामगाव या ठिकाणी ड्युटी करतात. तर उर्वरित एक महिला अधिकारी ह्या नेहमी सुट्टीवर असतात. गेल्या काही महिन्यांअगोदर या रुग्णालयापासून जवळच असलेल्या खापरखेड घुले – सोमठाणा या गावांमध्ये भगरीमधून काही लोकांना विषबाधा झाली असता, शेकडो विषबाधा झालेल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय बिबी येथे आणले असता, त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता. दुसरीकडे, या रुग्णालयातील रक्त-लघवी तपासणी मशीन ही गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना खासगी लॅबमधून रक्त, लघवी तपासून आणावी लागते. त्यामुळे गोरगरीब रुग्णावर याचा फार मोठा भुर्दंड पडत आहे. तरी येत्या दिनांक १ जुलैपर्यंत रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी व रक्त लघवी तपासणी मशीन उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सहदेव लाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. या निवेदनावर कार्तिक धाईत, अनिल लांडगे, ऋषिकेश धाईत, भागवत मुळे, तुषार मुर्तडकर, उद्धव आटोळे, राम डुकरे, चेतन ढाकणे, सागर मुर्तडकर, अजय कायंदे, पांडुरंग कुलकर्णी यांच्या स्वाक्षर्या आहेत.