डिझेल चोरीला गेले म्हणून दोन बसेस बंद केल्या; एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी मूर्खपणाचा कळस गाठला!
– तातडीने बससेवा पूर्ववत करण्याची प्रवासी संघटनांसह विविध संघटना व प्रवाशांची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मेहकर आणि खामगाव आगारातील दोन बसेस किनगावजट्टू येथे मुक्कामी गेल्या असता, दोन्ही बसमधील डिझेल चोरीस गेल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी चक्क दोन्ही बस बंद करून मूर्खपणाचा कळस गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बसेस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी याची दखल घेऊन दोन्ही बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. डिझेल चोरीस गेले म्हणून बससेवाच बंद ठेवण्याचा उफराटा कारभार अधिकार्यांनी केल्याने या परिसरातील गावांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खामगाव आगाराची बस ही अकोला येथे जाऊन अकोला ते किनगावजट्टूकरिता दररोज ५ वाजता अकोला येथून निघते. खामगाव, अमडापूर, लव्हाळा, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, बिबी येथून किनगावजट्टूला मुक्कामासाठी जाते. सतत ५० वर्षांपासून ही बस सुरु असून, कोराना काळातही बसने नियमित सेवा दिली. दिनांक २१ जूनरोजी बस क्रमांक एमएच ४०, एन ८९२२ ही किनगावजट्टू येथे मुक्कामी गेली असता, त्यातील डिझेलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. केवळ याच नव्हे तर मेहकर आगाराच्या एमएच ४० एन ८९२१ या बसमधीलसुध्दा डिझेलची चोरी झाली. चालक प्रवीण तांबटकर खामगाव आगार, आणि चालक महादेव नालेगावकर मेहकर आगार यांनी बिबी पोलीस स्टेशनमध्ये तंक्रार दाखल केलेली आहे.
सिंदखेडराजा ते मेहकरपर्यंत समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी प्रकरणात दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा शोधही लागला आहे. त्यांची वाहनेसुध्दा जप्त करण्यात आली आहे. तरीही पुन्हा डिझेलचोरीचा प्रकार त्याच त्याच भागात घडत असल्याने वाहन चालकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसमधील डिझेल चोरी गेल्यानंतर अकोला ते किनगावजट्टू आणि लोणार ते किनगावजट्टू ही मुक्कामी बस कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बिबी, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा येथील प्रवाशांना प्रवासासाठी बसच राहिली नाही. या भागातील शेतकरी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेतात. खामगाव आणि अकोला जाण्यासाठी आणि येण्यासाठी हक्काची बस असल्याने सर्व व्यापारी कामे आटोपून परत त्या बसने येतात. ही हक्काची बसच बंद झाल्याने साखरखेर्डा येथील व्यापार्यांना मोठा फटका बसला आहे. ही बस पूर्ववत सुरू करुन किमान बिबीपर्यंत पाठवावी, अशी मागणी साखरखेर्डा येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष भागवत मंडळकर, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गजानन इंगळे, शिवसेना शहरप्रमुख दीपक गवळी, गोपाल भीमराव शिराळे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन देताना केली आहे.