आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास हौश्या – बाजी आणि माऊली – वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे महाद्वार चौक अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजतगाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा समोरील महाद्वार ऐवजी महाद्वार रस्त्यावरील हॉटेल समोर केले. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजना अभावी पूजा करण्यास नेण्यात आले नाही.
मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथजी योगी, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पा., वस्ताद सहादु कुऱ्हाडे, योगेश कुऱ्हाडे, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली गुळुंजकर, भैरवनाथ ग्रामदेवता उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, पै. शिवाजीराव रानवडे, माऊली उर्फ डी.डी.घुंडरे पा., अजित मधवें आदीसह आळंदीतील नागरिक, विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो. तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील श्रींचा पालखी रथ ओढणारी मनाची बैलजोडीची भव्य मिरवणूक काढत असतात. यावेळी मिरवणूक वरुणराजाचे आगमनात झाली. युवक तरुणांच्या तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक झाली. कुऱ्हाडे यांनी भव्य भारदस्त बैल जोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे. या शिवाय एक पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवत दक्षता घेतली आहे. या लक्षवेधी बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत, हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये गांधी परीवारांतर्फे स्वागत करण्यात आली. कुऱ्हाडे परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत दोन्ही बैलजोडीची पूजा करून औक्षण केले. माऊली मंदिराचे महाद्वारा समोर यावर्षी बैलजोडी घेऊन येण्यासाठी आवश्यक असताना या बाबतचे नियोजनाचा अभाव यावर्षी राहिला. अनेक दशक वर्षातून यावर्षी प्रथमच अशी घटना घडली. बैलजोडीचे आगमन स्वागताचे कार्यक्रमात बैलजोडीस पायघड्या टाकण्याचे नियोजनास देवस्थानला विसर पडला. यावर आळंदी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मिरवणुकी दरम्यान काही वेळ आळंदीत वाहतूक कोंडी झालं. मात्र वाहतूक पोलीस विभागाने सुरळीत वाहतूक करण्यास परिश्रम घेत प्रदक्षिणा मार्गावर सुरक्षित वाहतूक करण्यास पाऊस असताना विशेष काळजी घेत यशस्वी नियोजन केले. मिरवणुकी साठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.