मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील जानेफळ परिसरात रविवारी (दि.२३) दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने नाले फुटून शेतात पाणी घुसल्याने नेमकेच पेरणी केलेली वाहून गेली आहे, त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्यांना शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
जानेफळ परिसरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी रविवारी जोरदार पाऊस झाला. जानेफळ येथे तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाले वाहू लागले. कित्येक ओढ्यातील पाणी शेजारच्या शेतात घुसल्याने नेमकीच केलेली पेरणी वाहून गेली. तसेच, या पेरणीवर गाळ व पाणी साचल्याने हे बियाणे सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जोरदार पावसाने नदी, नाल्याकाठची शेती जलमय झाली होती. आजच्या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी, नदी-नाले, ओढ्या काठच्या शेतकर्यांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे.