– जिल्हा प्रशासन गंभीरबाबीकडे कानाडोळा करत असल्याने थेट विभागीय आयुक्तांकडे धाव!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचे केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध असलेल्या निमगाव वायाळ खडकपूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस खुलेआम रेतीतस्करी सुरू असूनही, अद्याप अपवादात्मक परिस्थिती सोडता एकाही वाहनांवर कारवाई करण्यात आली नसताना, कोल्हापुरी बंधार्याजवळील खुलेआम होणारे अवैध रेती उत्खनन बंद करण्यासाठी कोल्हापुरी बंधारा विभागाने वारंवार महसुल विभागाशी पत्रव्यवहार करूनही हे उत्खनन बंद होत नसल्याने या परिसरातील शेतकर्यांनी महसूल आयुक्त यांना निवेदन सादर करून, निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधारा वाचविण्यासाठी निमगाव वायाळ येथील अवैध रेती वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व त्यांच्या पथकाने अनेक अवैध रेती वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केल्या आहेत. मात्र निमगाव वायाळ येथील नदीपात्रातून महसूल विभागाच्या अर्थपूर्ण व्यव्हरातून रात्रंदिवस खुलेआम अवैध रेती वाहतूक जोमात सुरू असताना, येथील वाहनावंर कारवाई करण्यास का टाळाटाळ केली जाते? या महसूल अधिकार्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. हे अवैध रेती उत्खनन बंद न झाल्यास पावसाळ्यात कोणत्याक्षणी बंधारा वाहून जाऊ शकतो. तरी या गंभीरप्रकरणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सूचना देऊन येथील अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करावी, अशा मागणीचे निवेदन १८ जूनरोजी देण्यात आले आहे.
तालुक्यातील फिरते पथक यांच्याकडून इक्टरचा दर एका रात्रीसाठी ३० हजार, टिपर ४० हजार, जेसीबी ६० हजार रुपये असा व्यवहार ठरवून येथील रेतीचे अवैध उत्खनन होत असल्याची चर्चा परिसरात आहे. सदर रेती तस्कराकडून संध्याकाळी गावातील रस्ते बंद करण्यात येत असल्याने गावातील एखादे पेशंट बिमार असल्यास त्यांना गावाबाहेर जाण्यास बंदी करण्यात येत आहे. सदर लोकेशनवाले चोवीस तास नशेत असल्याने यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे.