– मुदतीत ई-केवायसी न केल्यास विविध शासकीय लाभांपासून शेतकरी राहणार वंचित!
चिखली (महेंद्र हिवाळे) – मागील दोन वर्षांत जिल्ह्यांत अतिवृष्टी तसेच पावसाच्या प्रदीर्घ उघडीपमुळे शेतकर्यांना शेतीपिकांचे मोठे नुकसान सोसावे लागलेले आहे. या शेतकर्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येत असून, चिखली तालुक्यातील ९ हजार ४७९ शेतकर्यांनी अद्यापही ई-केवायसी अपडेट न केल्याने त्यांना यासह विविध शासकीय लाभांपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यानुसार, चिखली तालुक्यातील ई-पंचनामा पोर्टलवरील अपलोड केलेल्या लाभार्थ्यांपैकी या ९ हजार ४७९ शेतकर्यांनी आपली प्रलंबित असलेली केवायसी आधार प्रमाणिकरण येत्या २६ जून २०२४ पूर्वी पूर्ण करावे. अन्यथा, सदर माहिती राज्य सरकारला सादर केली जाईल, अशी माहिती चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.
याबाबत तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले, की तालुक्यातील ई-पंचनामा पोर्टलवरील अपलोड केलेल्या लाभार्थ्यापैकी ९ हजार ४७९ लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी आधार प्रमाणिकरण करणे शासनामार्फत बंधनकारक असल्याने ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना शासनाचा कुठलाही लाभ मिळणार नाही. लाभार्थी मयत असल्यास त्यांच्या वारसांनी स्वतःच्या आधार क्रमांकावर ई-केवायसी करावी. दिनांक २६ जून २०२४ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास सदर माहिती शासनास सादर करण्यात येऊन रद्द केली जाईल व लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांवर राहील. यानंतर याची या कार्यालयावर कुठलीही जबाबदारी राहणार नाही, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकर्यांनी संबंधित ग्रामपंचायतीत जावून किंवा शहरी भागातील शेतकर्यांनी चिखली शहरातील सेतु सुविधा केंद्रांवर जाऊन प्रलंबित ई-केवायसी प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात यावी, असे आवाहनही तहसीलदार काकडे यांनी केलेले आहे.
खरिप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानपीडित शेतकर्यांची यादी, त्यात नाव, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक याची यादी ई-पंचनामा पोर्टलवर प्रकाशित झाली होती. परंतु, हजारो शेतकर्यांनी त्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण न केल्याने त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त होऊ शकले नाही. तसेच, रब्बी व खरिप हंगामातही अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची आर्थिक मदतही शासनाने दिली असून, त्याची यादी ई-पंचनामा पोर्टलवर प्रकाशित केली होती. यापैकी अनेक शेतकर्यांनी त्यांची ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकर्यांनी आपले ई-केवायसी आधार प्रमाणिकरण करून बँक खात्याला आधारकार्ड जोडले आहे, त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे सेतु सुविधा केंद्र किंवा स्थानिक ग्रामपंचायतीत जाऊन शेतकर्यांनी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याची गरज आहे.
– अशी करा ई-केवायसी…
ई-केवायसी करण्यासाठी शेतकर्यांना आपला आधार क्रमांकाबरोबर मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. आपला मोबाईल क्रमांक बरोबर आहे का? याची खात्री करावी. बँक पासबुक खातेनंबर बरोबर आहे का? याची खात्री करावी. आधार क्रमांकाशी जी बँक लिंक असेल, त्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. यापूर्वी ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केलेली आहे, त्यांचे पैसे तीन ते चार दिवसांमध्ये जमा झालेले आहेत. परंतु सद्यस्थितीला जर आपण ई-केवायसी केली तर हे पैसेदेखील तीन ते चार दिवसांमध्ये जमा होऊ शकतात, किंवा शासनाच्या आदेशानुसार कोणत्याहीक्षणी पैसे हे शेतकर्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात. ई-केवायसी करण्यासाठी फक्त विशिष्ट क्रमांकाची आवश्यकता आहे. तो क्रमांक आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांनी सादर केलेल्या यादीमध्ये मिळेल.
————-