चिखली (महेंद्र हिवाळे) – मेहकरच्या संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचे कृपापात्र शिष्य संत बुलाखीदास उर्फ लोटांगण महाराज यांच्या रोहडा ते पंढरपूर येथे जाणार्या दिंडीची धुरा ह.भ.प. विनायकअप्पा महाराज डाखोरे यांच्याकडे समारंभपूर्वक सोपविण्यात आली. संत बाळाभाऊ महाराज यांच्या परंपरेत पंढरपूर येथे जाणार्या एकूण सहा दिंड्या आहेत. यांपैकी तपोवन देवी संस्थान रोहडा येथील या दिंडीच्या चालक आणि वीणेकरी पदावर डाखोरे महाराज यांची नियुक्ती झाल्यानंतर मेहकरच्या बाळाभाऊ महाराज गुरूपीठ, नरसिंह संस्थानच्यावतीने प्रा. डॉ. श्रीहरी महाराज पितळे यांनी वीणा आणि अधिकारपत्र देऊन मान्यता दिली. सर्व ग्रामस्थांनी लिखित स्वरूपात या नियुक्तीस मान्यता दिली.
लोटांगण महाराज यांनी गुरूआज्ञेनुसार सुरू केलेली ही दिंडी भोसले महाराज यांनी आजवर सांभाळली. त्यांच्यानंतर आता गुरुपीठाधीश रंगनाथ महाराज पितळे यांचे आदेशानुसार नियुक्त सर्व दिंडीचालक आणि कार्यकारी मंडळींनी निष्ठेने दिंडी चालवावी, नामस्मरणात वाटचाल करावी आणि सोबतच्या सर्वांची काळजी घ्यावी, अशी आशा डॉ.पितळे महाराज यांनी बोलताना व्यक्त केली. यावेळी नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशीष उमाळकर, संदीप कुटे, राजेश राऊत उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील डोंबरी येथील दिंडीकरी वारकर्यांसह गावातील गजानन कळंगे, मदन पंडित, सुरेश सोरमारे, रामकृष्ण सोरमारे, दीपक कळंगे, पुरूषोत्तम तायडे, पुंजाजी लव्हाळे, भीमराव तळेकर, उमेशअप्पा चित्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.