DEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJA

सिंदखेडराजा तहसीलमध्ये डॉ. आस्मा मुजावर परतल्या; वाळूतस्करांचे धाबे दणाणले!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तहसील कार्यालयात कार्यकाळ पूर्ण होऊन बदली झालेले अधिकारी पुन्हा काही कालावधीनंतर या तहसील कार्यालयात आल्याने महसूल प्रशासनात चर्चा रंगू लागल्या आहेत. येथे पूर्वी नायब तहसीलदार राहिलेल्या डॉ. आस्मा मुजावर या पुन्हा काही कालावधीनंतर परत आल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वाळूतस्करांचे चांगलेच कंबरडे मोडले होते. आता त्या पुन्हा परत आल्याने वाळूतस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परंतु, ठरावीक अधिकारी व कर्मचारी हे पुन्हा पुन्हा या तहसील कार्यालयात बदली होऊन कसे काय येतात? याबाबत मात्र तहसील परिसरात तर्कवितर्क लावले जात आहेत.

सविस्तर असे, की सिंदखेडराजा हे नाव संपूर्ण जगामध्ये राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळासाठी ओळखले जाते, आणि हेच सिंदखेडराजा तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ११५ खेडेगावांचा संबंध तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त येत असतो. या तहसील कार्यालयामध्ये अनेक विद्यार्थी, शेतमजूर, शेतकरी हे कामानिमित्ताने दूरवरून येत असतात. कधी त्यांची कामे होतात तर कधी होत नाही. पैशाची लालच असलेले काही ठरावीक कर्मचारी हे खुर्चीवर कमी व बाहेर जास्त हिंडताना दिसत असतात, हा विषय वेगळा. परंतु ज्यांनी सिंदखेडराजा तहसीलमध्ये आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, असे अधिकारी व कर्मचारी पुन्हा पुन्हा सिंदखेडराजा तहसीलमध्ये कसे येत आहेत? हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. या तहसीलमध्ये तीन-चार वर्षापूर्वी डॉ. आस्मा मुजावर ह्या नायब तहसीलदार पदावर कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली देऊळगावराजा येथे झाली. परंतु परत त्या १४ जूनला निवासी नायब तहसीलदार म्हणून सिंदखेडराजा तहसीलमध्ये आल्या आहेत. आता त्या परत आल्याने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असले तरी, ठरावीक अधिकारी व कर्मचारी या तहसीलमध्ये पुन्हा पुन्हा येत असल्याने आश्चर्य मात्र व्यक्त केले जात आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नाही. अनेक प्रकरणे अनेक उत्पन्नाचे दाखलेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. येथे कायमस्वरूपी तहसीलदार व कायमस्वरूपी निवासी तहसीलदार हे आतापर्यंत का मिळू शकले नाही, हा सवाल आहे. या तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून राहिलेल्या डॉ. मुजावर यांना सिंदखेडराजा तालुक्याचा दांडगा अभ्यास आहे. अनेक रेतीचे ट्रॅक्टर त्यांनी पकडले आहे. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्या आल्याने वाळूतस्करीला आळा बसेल, ही अपेक्षा असली तरी, ठरावीकच अधिकारी व कर्मचारी परत कसे येतात? हा प्रश्न आहे. काही नागरिक याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संदीप बंगाळे यांच्याकडे नायब तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला होता. त्यांनी तातडीने दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले निकाली काढले. तसेच अवैध रेतीला आळा घालण्यासाठी ट्रॅक्टर, टिप्परसुद्धा पकडले. त्यांची कामगिरी दमदार आहे, हे विसरता कामा नये, अशीही चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!