पाऊस रूसला; पेरण्या धोक्यात, पेरलेले उलटण्याची भीती!
– तातडीने प्रशासकीय हालचालीची गरज, राजकीय नेते अद्याप उदासीन!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आज येणार, उद्या येणार म्हणून चातकासारखी पावसाची वाट पाहणार्या शेतकर्याचे डोळे आभाळाकडे लागलेलेच असून, जिल्ह्यावर पाऊस सध्या तरी रूसलेला दिसत आहे. दरम्यान, थोड्या पावसावर व येईल या आशेवर काही भागात झालेली पेरणी उलटण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आ-वासून उभे आहे. गेल्या वर्षीचा कमी पाऊस व आता पाऊस नसल्याने नद्या कोरड्याठाक असून, बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. परिणामी, पाणीटंचाई उग्ररूप उजागर करीत असून, मुकी जनावरे चारा व पाण्यासाठी हंबरडा फोडताना दिसत आहेत. दरम्यान, पाऊसच नसल्याने जंगलेही भकास दिसत आहेत. अशा भयानक परिस्थितीत जनावरांसाठी चाराडेपो उघडण्याची गरज असून, प्रशासनाच्या याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. यासाठी कोठे ई-क्लास जमीन आहे याबाबत शोध घेतला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पीक झाले नाही. परिणामी, खर्चही वसूल झाला नाही. कशीबशी आलेली सोयाबीन एलो मोझाकने फस्त केले होते तर कपाशीला विविध रोगांनी नेस्तनाबूत केले. त्यातच सोयाबीन व कपाशीला भावच नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. रब्बी व उन्हाळी पिकातही शेतकर्याला चांगलाच फटका बसला. मोठा खर्च करूनही भाव नसल्याने पेरणीच्या तोंडावर मातीमोल भावात ज्वारी, भूईमुग, सोयाबीनसह विविध पिके व्यापार्यांच्या घशात घालावी लागत आहेत. अशाही परिस्थितीत शेतकरी स्वतःला सावरत खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे. चकरा मारून थकल्यावर कुठे बँकेचे पीककर्ज, मायक्रोफायनान्सचे बचत गटाचे कर्ज तर कुठे सावकारी काढून बियाणे, खते खरेदी केले आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यात काही भागात पाऊस झाला. याच पावसावर शेतकर्यांनी जवळजवळ ६ टक्के म्हणजे ४२ हजार ८९ हेक्टरवर मुख्यता कपाशी, सोयाबीन या पिकाची पेरणी केली. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात १३१८ हेक्टर, संग्रामपूर ४१८ हेक्टर, चिखली ९ हेक्टर, बुलढाणा ११,११७ हेक्टर, देऊळगावराजा १४५३ हेक्टर, मेहकर ३७३८ हेक्टर, सिंदखेडराजा ५३७२ हेक्टर, लोणार ४५९ हेक्टर , खामगाव ६२५० हेक्टर, शेगाव २५८ हेक्टर, मलकापूर ५७४२ हेक्टर, मोताळा ५५६२ हेक्टर तर नांदुरा तालुक्यात ३९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी कृषी विभागाची आकडेवारी सांगते. परंतु आठ दिवसापासून पाऊस रूसल्याने व सर्वदूर पाऊस नसल्याने शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत, तर पाऊस नसल्याने उगवलेले अंकुर कोमजत असून, आणखी दोन-तीन दिवस पाऊस नसल्यास पेरणी उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काळजी नाही, पुढील पाच दिवसांत पाऊस – हवामानतज्ज्ञ येदुलवार
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. असे मनेश येदुलवार, हवामान शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतांना सांगितले.
गेल्या वर्षीचा कमी पाऊस व आता पावसाळा लागूनही कडक उन्ह यामुळे नद्या कोरड्या ठाक असून, बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. दुसरीकडे, पाणी व चार्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मुकी जनावरे चारा व पाण्यासाठी हंबरडा फोडताना दिसत आहेत. तर ऊन्ह तापत असल्याने माळरान ओसाड असून, दिवसभर वणवण फिरूनही जनावरांच्या पोटात घासही जात नाही, अशी भयावह स्थिती पाहावयास मिळत आहे. याबाबत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेत चाराडेपो व छावण्या उघडण्याची गरज निर्माण झाली असून, प्रशासनदेखील तयारीला लागल्याची माहिती आहे.
आतापर्यंत जिल्हाभरात झालेला पाऊस
बुलढाणा १५.४० टक्के, चिखली १३.४२ टक्के, देऊळगावराजा २०.७१, सिंदखेडराजा १७.७५, लोणार १५.९८, मेहकर ११.३७, खामगाव ११.१२, शेगाव ११.५८, मलकापूर १२.३४, नांदुरा १४.११, मोताळा १४.८९, संग्रामपूर ४.२ तर जळगाव जामोद तालुक्यात १८.९५ टक्के पाऊस पडला असून, जिल्ह्याची सरासरी १३.९७ टक्के पाऊस झाल्याचे प्रशासनाची आकडेवारी सांगते.
———