Breaking newsBuldanaBULDHANAHead linesLONARPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

विधानसभेसाठी सिंदखेडराजाचे वारे फिरले; अपक्षाला डोक्यावर घेतले, आता आपला घरगडीच बरा!

– डॉ. शिंगणेंच्या मतदारसंघात रविकांत तुपकरांना ‘लीड’ हे कोडे सुटेना!; मुंबई, दिल्लीतही खलबते!
– मराठा-वंजारी जातीय समिकरणेही विधानसभा निवडणुकीवर पाडणार प्रभाव; डॉ. सुनील कायंदे, विनोद वाघ, की डॉ. गणेश मांटे मैदानात उतरणार?

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात काहीही होऊ शकते, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांना आला आहे. त्यामुळे मीच या मतदारसंघाचा आमदार राहिलं हे स्वप्न कोणीही पाहू नये. विधानसभा निवडणुकीच्या फडाचा ढोल वाजविणार्‍यांना या निकालाने सूचक संकेत दिलेले आहेत. लोकभेत एकदा कौल दिला म्हणजे तो विधानसभेत मिळेलच, या भ्रमात कोणी राहू नये. कारण शेवटी आमचा घर गडीच बरा ही भावना मतदारसंघात हळूहळू निर्माण होत चालली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांना लोकसभा निवडणुकीत दिलेलं दान विधानसभा निवडणुकीत मिळेलचं या भ्रमात त्यांनी राहू नये, तेवढं मात्र निश्चित.

मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून (२०१४ ते २०१९ हा मधला काळ वगळता) माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी नाकारली होती, की स्वत: डॉ. शिंगणे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. हे कोडं आजही कुणालाही कळलेलं नाही. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांनाच मतदान करा, असे सांगत असताना तेवढ्याच ताकदीने मतदार हा विरुद्ध दिशेने चालला. डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा पक्ष प्रवक्ते विनोद वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य हे खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी असतांनाच, मतदारांनी मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चक्क डोक्यावर घेतले होते. ही निवडणूक आपलीच आहे. असे समजून सवडदसारख्या छोट्या गावात ७० वर्षाच्या दमयंतीबाई देशमुख या आजीने घरोघरी जाऊन प्रचार करुन तुपकरांना २५० मतांचे मताधिक्य मिळवून दिले. अख्ये गाव खासदारासोबत, मतदार मात्र भलतीकडेच. यात सवडदच नाही तर ग्रामीण भागातील शेतकरीपुत्रांनी मत (दान) दिलं. ७५ हजार मते घेणार्‍या रविकांत तुपकरांच्या वाटेत वरील एकाही नेत्यांचा सहभाग नाही. त्याचे श्रेयही कोणी घेऊ नये. तसं आजपर्यंत कोणीही घेतले नाही. परंतु, याचे खापर माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर फोडले तर ते मोठे होतात. ही सावध भूमिका घेतली जात आहे. काहीही न करता डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघात तुपकरांना एकतर्फी मतदान झाले कसे? याची चर्चा मुंबईपर्यंत केव्हाच गेलेली आहे. आता दिल्लीतल्या दरबारात मंथन होणार आहे. याचेही कारण आहे, भाजपाला विधानसभा स्वबळावर लढवायच्या असतील तर निवडून येणारा उमेदवार यांची चाचपणी सुरू झाली आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांचे चिरंजीव डॉ. सुनील कायंदे, भाजपचे पक्ष प्रवक्ते विनोद वाघ, जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश मान्टे हे तिघे आघाडीवर आहेत. भाजपला या तिघांपैकी कोण फायद्याचा ठरणार आहे, याचाही अहवाल समोर गेल्याचे समजते. तर शिंदे गटाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनाही पुन्हा निवडणूक लढण्याची अपेक्षा आहे. परंतु, खासदार प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी मतदारसंघात पकड घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कालपर्यंत एकमेव नाव डॉ.शशिकांत खेडेकर यांचे होते, त्याला पर्याय योगेश जाधव आल्याने खेडेकर अडचणीत दिसत आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडे विधानसभा निवडणुकीत लढत देईल, एवढा सक्षम उमेदवार नाही. त्यामुळेच प्रा. नरेंद्र खेडेकर यांना सिंदखेडराजा मतदार संघात तुपकर यांच्यापेक्षा ४० हजार मते कमी पडली. जी ३६ हजार मते पडली ती नेमकी कुणाची? याचेही मंथन होणे महत्त्वाचे आहे.
चिखली, मेहकर, बुलढाणासारखी मत सिंदखेडराजा मतदारसंघात खेडेकर यांना मिळाली असती तर चित्र वेगळेच असते. विजयाची मानसिकता ठेवून कार्यकर्ते लढले असते तर बरे झाले असते. पण समोरच्या दारातून उध्दव ठाकरे गटाचा आणि मागच्या दारातून शिंदे गटाचा कार्यकर्ते येत असतील तर विश्वास ठेवायचा कसा? असो निवडणूक संपली विधानसभा निवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी खूपच कसरत यांना करावी लागणार आहे, तेवढं मात्र निश्चित. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कोण! हे जरी समोर आले नाही तरी शेकडो कार्यकर्ते पवार साहेबांचे हितचिंतक आहेत. तसंही गौरव गणेश शिंगणे आणि गायत्री शिंगणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. १ मेरोजी शेंदुर्जन गावात त्यांनी तुतारी वाजवली असली तरी त्या तुतारीचा आवाज फारसा प्रतिसाद देऊन गेला नाही. तसा नंतर संपर्कही ठेवला नाही. कदाचित ती तुतारी नेमकी कोणी वाजवायची सांगितली! याचेही मंथन सुरू झाले आहे. कदाचित हा दबाव तंत्राचा भाग तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
या मतदारसंघात पडद्याआड बर्‍याच घडामोडी सुरू आहेत. राजकीय घडामोडी घडत असताना पुन्हा ‘पाना’ येथे चालणे आता शक्य होणार नाही. जे झालं ते लोकही विसरले. आपापल्या पक्षात, गटात जाऊन स्थिरावले. रविकांतभाऊ तुपकर हे पुढची लोकसभेची तयारी करा, पण आमच्या खांद्यावर येवढाही भार टाकू नका! जो घाटाखाली उतरताना डोईजड होणार नाही. तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत. पण विधानसभा सोडून! आता आमचं घर पाहू द्या! अशा भावना या मतदारसंघातून उमटू लागल्या आहेत.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!