चिखली तहसीलदारांच्या खात्यात 20.74 लाख; मृत सईच्या पालकांना उद्या-परवापर्यंत मिळेल 4 लाख!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील सई भारत साखरे या चिमुकलीचा झोक्यात झोपलेली असताना चक्रीवादळाने घरावरील पत्रांसह झोका उडून गेल्याने दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतानाच, नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले प्रतापराव जाधव यांनी देऊळगाव घुबे येथे जात सईच्या कुटुंबीयांना चार लाख रूपये शासकीय मदतीचा धनादेश दिला होता. हा धनादेश सईच्या पालकांनी अद्याप खात्यात जमा केलेला नाही. तो खात्यात जमा होताच हे पैसे पीडित कुटुंबाला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, स्वागताचे सर्व कार्यक्रम रद्द करत, केंद्रीय मंत्री जाधव हे या कुटुंबीयांच्या मदतीला धावले होते.
देऊळगाव घुबे परिसरात १२ जूनरोजी मोठे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळात सई भारत साखरे ही अवघी सहा महिन्यांची चिमुकली, झोक्यासह उडून गेली होती व ५०० फुटावर आदळून ठार झाली होती. या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त केली जात असताना, दिनांक १५ जूनरोजी केंद्रात नव्याने नियुक्त झालेले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देऊळगाव घुबे येथे जात पीडित साखरे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना चार लाख रूपयेमदतीचा धनादेश सुपूर्त केला होता. हा धनादेश हा शासकीय मदतीच्या सानुग्रह अनुदानाचा होता. तो, लाभार्थी साखरे यांनी अद्याप त्यांच्या खात्यात जमा केलेला नाही. उद्या-परवा त्यांनी तो खात्यात जमा करताच त्यांना ही तातडीची आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना लाभार्थी साखरे यांनी खात्यात पैसे नसल्याने चेक भरू नका, असे तहसीलमधून सांगण्यात आल्याचे पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर तहसीलदारांनी पुढे येऊन, तहसीलच्या खात्यात 20 लाख 74 हजार 963 रूपये जमा असल्याचे सांगितले. तसेच, लाभार्थीने अद्याप आपला धनादेश जमा केलेला नाही, असे स्पष्ट केले होते.