साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा परिसरात ९ आणि १० जूनला सायंकाळी साडेसात वाजेच्यानंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडल्याने अनेक शेतात पाणी तुंबले आहे. तर पुन्हा ३३ केव्ही लाईनवर बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ९ जूनला रात्रभर वीजपुरवठा खंडीत झाला होता, आजही पुन्हा रात्रभर वीजपुरवठा खंडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरखेर्ड्यासह परिसरातील अनेक गावे अंधारात गेली आहेत.
दिनांक ९ जून रोजी रात्री ८ वाजता मेघगर्जनाला सुरुवात झाली. पाहाता पाहाता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल रात्रभर पाऊस बरसत राहिल्याने गुंज, वरोडी, साखरखेर्डा, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, शिंदी, पिंपळगाव सोनारा, सवडद, मोहाडी, राताळी भागात वादळीवार्यासह पाऊस पडल्याने शेतातून पाणी वाहिले. अनेक शेतात पाणी साचून छोटे तलाव निर्माण झाले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. एकीकडे पाऊस सुरु होताच साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत होतो, ही बाब नित्याची झाली आहे.
मेहकर ते साखरखेर्डा ही ३३ केव्हीची लाईन १९६५ साली टाकण्यात आली. त्यानंतर याच ३३ केव्ही लाईनवर देऊळगाव माळी, हिवरा आश्रम, लव्हाळा येथे सबस्टेशन आहे. वीजेचा प्रवाह वाढला. जीर्ण झालेल्या वीजवाहक तारेची मुदतही संपली, परंतु, ना वीजवाहक तार बदलली, ना उर्वरित उपकेंद्रासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. एकाच लाईनवर भार वाढल्याने वार्याची झुळूक जरी आली तरी साखरखेर्डासह चारही उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडीत होतो. ही आजपर्यंतची शोकांतिका आहे. याकडे कोणताही राजकीय पदाधिकारी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. जून महिन्यात तळपते उन्ह, प्रचंड उकाडा निर्माण होत असल्याने अंगाची लाही लाही होते. त्याच वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. कधीकधी तर रात्रभर वीज पुरवठा गुल होतो. एकही कर्मचारी ब्रेकडाउनबाबत माहिती देत नाही. त्यांना काहीच माहिती नसते. असाच काही कारभार सुरू आहे. आजही वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल की नाही, याची शाश्वती मिळत नाही.