DEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJA

दोन वर्षांपासून अर्धवट सोडलेल्या किनगावराजा ते हिवरखेड रस्त्यासाठी सरपंचांसह ग्रामस्थांचे उपोषण

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील किनगावराजा येथील रस्त्याचे काम गत दोन वर्षांपासून ठेकेदाराने अर्धवट स्थितीमध्ये सोडलेले आहे. हा रस्ता ताबडतोब पूर्ण करावा, या मागणीसाठी किनगावराजा येथील सरपंच प्रकाश मुंढे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष काकड,ग्रामस्थ सूर्यकांत निंबाळकर व महादेव दराडे यांनी ७ जूनपासून आमरण उपोषणास प्रारंभ केलेले आहे. गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू असून, प्रशासनाने या उपोषणाकडे कानाडोळा चालवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
https://breakingmaharashtra.in/

किनगावराजा ते हिवरखेड रस्त्याचे बांधकाम गेली दोन वर्षांपेक्षाही जास्त दिवसांपासून सुरु असून, सदर रस्ता अर्धवट स्थितीमध्ये सोडल्याने दररोज कामानिमित्त रस्त्यावरून ये – जा करणार्‍यांना व अगदी रस्त्याच्या कडेला घरे असणार्‍या ग्रामस्थांना अत्यंत त्रास होत आहे. राज्य महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने ज्या ठिकाणी हा रस्ता अर्धवट सोडण्यात आला आहे, तेथून येणार्‍या चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना आपापले वाहन चालवताना अपघात होऊ नये, यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोजच्या या त्रासामुळे कंटाळून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, तसेच रस्त्याचे काम ज्यांनी घेतले आहे ते ठेकेदार हेसुद्धा वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष करीत असल्याने गावाच्या सरपंचासह ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. परंतु तरीही सदर रस्त्याचे काम पूर्ण न केल्यामुळे उपोषणास प्रारंभ करण्यात आला असल्याचे उपोषणकर्त्यानी सांगितले आहे.
हिवरखेड पूर्णा रोडवर ७ जूनला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान उपोषण सुरू करण्यात आले असून, या दरम्यान माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे रस्त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बालाजी काबरे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हा कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून सदर रस्त्याचे ठेकेदार रामा नाथा दराडे यांनी वेळेवर रस्त्याचे काम पूर्ण केले नसल्याने त्याच्यावर दररोज ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येऊन सदर ठेकेदारचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली असल्याचे सांगितले आहे. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठलाच समन्वय नसल्याचे यावेळी दिसून आले असून, ग्रामस्थांना मात्र याचा विनाकारण त्रास होत आहे. प्रशासनाकडूनही आमची समस्या दूर झाली नसल्यानेच आमरण उपोषण करीत असल्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी सांगितले आहे.
या उपोषणकत्यारंना हिवरखेड, विझोरा, निमगाव वायाळ, साठेगांव ग्रामपंचायतीने उपोषणास पाठिंब्याचा ठराव दिला आहे. काल, उपोषण सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश भाले हे गेले असता, उपोषणकर्ते यांनी अगोदर काम सुरु करा, नंतर दोन दिवसांनी आम्ही उपोषण सोडतो, अशी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी विनायक पाटील भानुसे यांनी उपकार्यकारी अभियंता काबरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्याने संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदारावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने या ठेकेदारावर कुठलीच कारवाई होत नसल्याची परिसरात चर्चा आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!