– गुरूवारी जिल्ह्यात येणार; शेगाव येथे संत गजाननांच्या दर्शनाला जाणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मानवी देह तसा नश्वर असल्याने तो कोणाच्या तरी कामी पडावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प जाहीर केला. आज, दि.११ जूनरोजी दिल्लीत आपल्या आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारला, व लगेचच मरणोत्तर देहदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, गुरूवारी ते जिल्ह्यात परत येणार असून, शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले खा. प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून वर्णी लागली असून, त्यांना जनतेशी थेट संबंधित असलेले आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. आज, दि. ११ जूनरोजी प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील मंत्रालयात आपल्या पदाचा पदभार घेतला. यावेळी त्यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प करत, तशी घोषणादेखील केली. देशातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आपण बांधील असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.