– विधानसभा निवडणुकीत तरी ठाकरेंनी चूक सुधारण्याची गरज!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलढाणा लोकसभेची निवडणूक अतिशय अतीतटीची झाली. शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा विजयी झालेत. परंतु, यावेळेस त्यांचे मताधिक्य घटले आहे. शिवाय, जाधव यांचा नरेंद्र खेडेकर यांनी जोरदार पाठलाग केला असल्याचेही दिसून आले. इतकी दमछाक यापूर्वी प्रतापरावांची कधी झालेली नाही. शिवसेना ठाकरे पक्षाकडून रविकांत तुपकर हे इच्छूक होते. परंतु, ‘शब्द दिला आहे’, असे सांगून ठाकरेंनी तुपकरांना उमेदवारी नाकारली. या निवडणुकीत तुपकर हे ठाकरे सेनेचे उमेदवार असते तर कदाचित आज ठाकरेंनी बुलढाण्याची जागा ऐतिहासिक अशा अडिच ते तीन लाख मतांच्या फरकाने जिंकता आली असती. किंवा, तुपकर हे मैदानात नसते तर प्रा. खेडेकर हेदेखील विक्रमी मतांनी विजयी झाले असते. परंतु, आता ‘जर तर..’च्या म्हणण्याला काही अर्थ नसला तरी, ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत तरी आपली चूक दुरूस्त करण्याची गरज आहे. शिवाय, तुपकरांनीदेखील अपक्ष म्हणून नशीब न अजमावता एखाद्या राजकीय पक्षांतच प्रवेश करणे सोयीस्कर राहील.
लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा बाजी मारली आहे. त्यांच्यासाठी शिंदे सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, नेते आणि प्रमुख कार्यकर्ते धावून आले होते. त्या तुलनेत प्रा. नरेंद्र खेडेकर व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी ही निवडणूक जवळपास स्वबळाचाच लढा होता. शिवसेनेतील बंडखोरीनंतर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती. तसेच, कट्टर शिवसैनिकदेखील ठाकरे यांच्या बाजूने उभे होते. त्याचा फायदा अर्थातच प्रा. खेडेकर यांना झाला. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जिल्ह्यातील प्रत्येक गाव अन खेडे पिंजून काढत, शेतकरीवर्गासाठी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून एक मत मागितले होते. त्यानुसार, ग्रामीण भागातून तुपकर यांना चांगला प्रतिसाद मिळाला. तुपकर व खेडेकर यांना मिळालेली मते ही प्रतापराव जाधवविरोधी मते आहेत. या दोघांत विभाजीत झालेली ही मते कुणा एकालाच मिळाली असती, तर या निवडणुकीचे चित्र फार फार वेगळे असते. मतविभाजनाचा उद्धव ठाकरे यांना फटका तर प्रतापराव जाधव यांना मोठा फायदा झाला आहे. ठाकरे यांनी एक तर रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, किंवा त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न तरी करायला पाहिजे होते. परंतु, दुर्देवाने तसे झाले नाही. तुपकरांना थाबवले गेले असते तर बुलढाण्याची जागा ठाकरे यांना राखता आली असती. परंतु, ठाकरे यांनी तुपकर यांना अजिबात गांभिर्याने न घेणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली आहे, तसेच तुपकर फार फार तर २५ हजारांच्या आसपास मते घेतील, असे म्हणणारेही आता चांगलेच तोंडावर पडले आहेत. या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना ३ लाख ४९ हजार ८६७ व प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजारह ३८८ इतकी मते मिळाली. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर राहिलेले रविकांत तुपकर हे २ लाख ४९ हजार ९६३ इतकी मते मिळवू शकलेत. तर अपक्ष अशोक हिवाळे यांनी १५ हजार ४३६ व संदीप शेळके यांनी १३ हजार ५० मते घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुपकरांनी घेतलेली मते ही तशी लक्ष्यवेधी अशीच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असाच निष्कर्ष या निवडणूक निकालातून निघतो आहे.
रविकांत तुपकर यांचा पराभव का झाला?
पहिल्याच लोकसभा निवडणुकीत तब्बल अडिच लाख मते घेणे ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जमेची बाजू आहे. परंतु, एक लाखाच्या फरकाने त्यांचा झालेला पराभव ही बाबदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. घाटाखालील तालुक्यातून तुपकरांना सर्वाधिक फटका बसला. घाटाखाली लक्ष द्या, ही बाब त्यांना त्यांचे अनेक जवळचे मित्र सांगत होते. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, ऐन निवडणुकीत तुपकरांविषयी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या नकारात्मक बातम्यांचे खंडन करण्यात त्यांची यंत्रणा कमी पडली. सोशल व डिजीटल मीडिया सोडला तर कोणताही मोठा मीडिया त्यांची बाजू मांडत नव्हता. निवडून आले तर तुपकर हे भाजपात जाणार, आणि शेतकर्यांना फसविणार्या व्यापार्याचे वकीलपत्र अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी घेतले, या दोन अफवा त्यांच्याविरोधात मोठा नकारात्मक परिणाम घडवून गेल्यात. सुरूवातीला मुस्लीम व दलित समाज त्यांच्यासोबत होता, परंतु नंतर अचानक या समाजाने त्यांना मतदान करण्याचे टाळले व महाआघाडीच्या उमेदवाराला आपली मते दिलीत. खरे तर प्रतापराव जाधव व नरेंद्र खेडेकर यांच्यातील मतविभाजनाचा फायदा रविकांत तुपकर यांना होईल, असा अंदाज होता. नेमके याच्या उलटे झाले. रविकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर यांच्यातील मतविभाजनाचा फायदा प्रतापराव जाधव यांना झाला. वंचित आघाडीच्या उमेदवाराने किमान दीड लाख मते घेतली असती तर रविकांत तुपकर यांच्या विजयाची शक्यता होती. परंतु, वंचित आघाडीच्या उमेदवाराने ९८ हजारच मते घेतली. त्यामुळे जाधव व खेडेकर यांची मते कमी झाली नाहीत. त्याचाही फटका तुपकरांना बसला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, घाटाखाली जळगाव जामोद व खामगाव तालुक्यात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी तुपकरांचे काम केले नाही, अशी खात्रीशीर माहिती आहे. उलट तुपकरांच्याविरोधात प्रतापराव जाधवांचे काम हे कार्यकर्ते करत होते, अशी या भागात चर्चा आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जाहीर केलेला पाठिंबा इकडे वांझोटा ठरल्यात जमा आहे. घाटावरदेखील अनेक ठिकाणी तुपकरांचे कार्यकर्ते म्हणून घेणारे ‘अप्पलपोटे कार्यकर्ते’ लक्ष्मीदर्शन घेऊन वेगळ्याच उमेदवारांचे काम करत होते. बूथवर कुणाच्या बाजूने मतदान चालू आहे, याचा अंदाज त्यांच्या बूथवरील कार्यकर्त्यांना आला नाही. आता विधानसभेला सामोरे जाताना तरी रविकांत तुपकरांनी बूथ रचनेपासून ते गावोगावी कार्यकर्त्यांच्या फळीपर्यंत नव्याने संघटनात्मक रचना करण्याची गरज आहे.
———–