– शेकडो वृक्ष उन्मळून पडली; खते, बियाणे, अवजारांचेही प्रचंड नुकसान
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक गावांना चक्रीवाादळाचा जोरदार तडाखा बसला असून, अनेक घरांवरील, बखारीवरील टिनपत्रे पत्त्यासारखी उडाल्याने शेतीसाहित्यासह संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने शेंदुर्जन ते जागदरी रस्ता बंद झाला होता. शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमधील लिंगा गावावर चक्रीवादळामुळे अरुण चेके यांच्या बखारीवरील टिनपत्रे उडाल्याने बखारीत ठेवलेले ४२ रसायनिक खतांच्या गोण्या पावसामुळे भिजल्या आहेत. १८:१८:१० या खतांचे पाणी झाले. त्याच बरोबर सोयाबीन बियाणे, कपाशी बियाणे यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यात किमान एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावातील १५ ते २० घरावरील टिनपत्रे उडाली असल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान होऊन बसले होते, त्यामुळे अनेकांचे संसार उघडल्यावर आले आहेत.
जागदरी येथील अनेक शेतकरी नेटची शेती करीत असून, काल रात्री आलेल्या चक्रीवादळाचा फटका नेटची शेती करणार्या शेतकर्यांना बसला आहे. गजानन सांगळे यांच्या आणि इतर १० शेतकर्यांचे नेट उखडून पडले आहे. यात मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जागदरी येथील श्री शंकर बाबा संस्थानच्या परिसरातील वडाचा मोठा वृक्ष धारातीर्थी पडला आहे. तर शेंदुर्जन ते जागदरी रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडली आहेत. जागदरी येथील विठोबा कायंदे, रामकिशन जायभाये, वसंता मोरे, शिवाजी मोरे यांच्यासह अनेक घरावरील टिनपत्रे उडाली असल्याने संसार उद्धवस्त झाले आहेत. राजेगाव, बाळसमुंद्र, सायाळा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सावंगी भगत, तांदुळवाडी, गुंज, कंडारी, भंडारी, आंबेवाडी या भागातील गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या संपूर्ण भागाची पाहणी करून शासनाने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
गेल्या २० वर्षांत चक्रीवादळाचा फटका कधीच या भागात बसला नाही. यावर्षी २९ मार्चला सवडद, मोहाडी, राताळी, गुंज, वरोडी या भागात अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यानंतर ९ आणि १० जूनला सतत दोन दिवस वादळीवार्यासह अवकाळी पाऊस पडल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याची दखल महसूल विभागाने घेऊन पंचनामे करण्याचे आदेश आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
– दिनकरराव देशमुख, माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य शेंदुर्जन
शेंदुर्जन आणि साखरखेर्डा मंडळातील अनेक गावाला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
– प्रवीण धानोरकर, तहसीलदार सिंदखेडराजा
साखरखेर्डा, दरेगाव, लिंगा, राजेगाव, जागदरी या भागातील अनेक वीजवाहक पोल तुटून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी ताराही तुटल्याने वीज पुरवठा ३६ तास खंडीत झाला होता. अद्यापही लिंगा, बाळसमुंद्र, सायाळा, जागदरी, आंबेवाडी यासह शेंदुर्जन सबस्टेशन अंतर्गत खेड्यातील वीजपुरवठा खंडीत आहे. साखरखेर्डा ते मेहकर ३३ केव्ही लाईनवर नेहमीच वीज वाहक तार तुटत आहेत. ९ जूनला रात्रभर वीजपुरवठा खंडीत झाला होता. काल, १० जूनलाही सायंकाळी ७ वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री १० वाजता सुरु झाला. आज दिवसभर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोल उभे करणे, तार टाकणे यातच मग्न होते. अखेर प्रत्येक गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला असला तरी पुन्हा चक्रीवादळाचा फटका बसला तर नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे.
—–