घटनास्थळ पाहणी न करताच चौकशी समितीचे अध्यक्ष तक्रारकर्त्याला म्हणतात पुरावे सादर करा!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील गोदरी येथील शिवारात सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत लागवड केलेल्या झाडांच्या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, त्याचप्रमाणे दोषींना कायम स्वरुपी बडतर्फ करून केलेल्या भ्रष्टाचाराची सक्तीने वसुली करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हाधिकारी व विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख यांनी केली होती. या प्रकरणी त्रीसदस्यीय समिती नेमली गेली. परंतु त्या वनविभागाच्या जमिनीमधे झाडेच नसून, बिल काढल्याची तक्रार असतांना चौकशी समितीचे अध्यक्ष व समितीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करणे आवश्यक होते. परंतु चौकशीचे आदेश असूनही कारवाई तर केलीच नाहीच, परंतु उलट चौकशी चा कालावधी उलटल्याने तक्रारकर्ते यांनाच या प्रकरणी सविस्तर तक्रार दिलेली असतांना पुरावे सादर करण्याचे पत्रच समिती अध्यक्ष लाड यांनी दिले आहे. तर समितीने दिलेला १५ दिवसांचा कालावधी उलटूनदेखील झाडे लावली आहेत, किंवा कसे याची पाहणीदेखील करण्यात आली नसल्याने समितीने विभागीय वनअधिकारी यांच्या चौकशी आदेशाला समितीकडून केराची टोपली दाखविण्यात आला असल्याचा आरोप तक्रारकर्ते यांनी केला आहे.
गोदरी शिवारात नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत झाडांची लागवड करण्यात आली. गोद्री शिवारातील गट नं.१९९, २०१ मध्ये दि. ३ मार्च २०२१ योजनेतील कामांना मान्यता देण्यात येऊन १७ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली. १८, ८८७ रोपे लावण्यात आली. त्यामधे साग,शिसू, बोर, सिताफळ, चिंच, बकाननीम, पिंपळ, काशीद, जांभूळ यासह विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश होता. परंतु झाडे न लावताच बिल काढल्याचा आरोप तक्रारकर्ते यांनी केला असून, ट्रॅक्टरद्वारे पाणी देऊन बिल काढले असल्याचा आरोप तक्रारीमधे करण्यात आला होता. या प्रकरणी गणेश देशमुख यांच्या गंभीर तक्रारीनंतर २४ मे २०२४ रोजी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बुलढाणा यांनी त्रीसदस्यीय समिती नेमली होती. तर समितीने झाड संगोपन व देखभाल करणे, निंदणी करणे, मरगळ भरणे, पाणी देणे, जाळ रेषा घेणे, रोपवनास पाणी दिल्याबाबतचे जीओ टॅग फोटो व आवशक पुरावे बघून चौकशीत समोर येणार्या बाबींचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल निष्कर्षासह दिनांक १० जून २०२४ पर्यंत न चुकता सादर करावा, असे आदेश समितीला दिले होते. तर या प्रकरणी विलंब करु नये, असे आदेशसुद्धा समितीला देण्यात आले होते. परंतु समितीला दिलेला कालवधी उलटूनदेखील साधी पाहणीदेखील समिती अध्यक्ष व सदस्य यांनी केली नाही, तर उलट कालावधी उलटल्याचे बघून सात दिवसांच्या आत पुरावे सादर करण्याचे फर्मान चौकशी समितीचे अध्यक्ष यांनी तक्रारकर्ते यांना सोडल्याने वनविभाग मुद्दामहून वेळकाढूपणा करत असून, दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप तक्रारकर्ते यांनी केला आहे. तर झाडे नसल्याचे व्हिडिओ पुरावे यापूर्वीच सादर करण्यात आले असून, ते पुरावे ग्रह्य धरावे किंवा घटनास्थळी पाहणी करून मस्टर चेक करावे हेच प्रत्यक्ष महत्वाचे पुरावे असल्याने दोषीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्ते यांनी समितीचे अध्यक्ष यांच्या दिलेल्या पत्राला उत्तर देतांना केली आहे.
दोषींना पाठीशी घातले जात असल्याने विभागीय वनअधिकारी यांच्यावरच कारवाई करा – विनायक सरनाईक
या गंभीर प्रकरणी अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. गोदरी येथून अनेक तक्रारी विभागीय वन अधिकारी यांना दिल्या गेल्या. परंतु घटनास्थळ पाहणी तर अधिकारी यांनी केलीच नाही, परंतु चौकशी समिती नेमली असतांना समितीलासुद्धा इतर कामे असतात, असे उत्तरे तक्रारकर्ते यांना दिल्याचा प्रकार घडला असल्याने त्यांनी या प्रकरणी पाहणी करणे आवश्यक असतांना, एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा म्हणत असतांना, वन अधिकारीच दोषींना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी केली आहे. या प्रकरणी चौकशी करुन तातडीने दोंषीवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा विभागीय वन अधिकारी यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.