देऊळगाव घुबेत चक्रीवादळाने घेतला पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी!
– देऊळगावघुबे परिसराला विजांच्या गडगडाटासह पाऊस व चक्रीवादळाचा जोरदार तडाखा
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे परिसराला चक्रीवादळासह तुफान पावसाने चांगलाच तडाखा दिला. या वादळाने गावातील अनेक घरांवरील लोखंडी अँगलसह टीनपत्रे उडालीत. तसेच, विद्युत पोल उखडून विजेच्या तारा तुटल्यात. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील अन्नधान्य व शेतीसाठी लागणारे खते, बियाणे यांचे मोठे नुकसान झाले. अतिशय हृदय हेलावणारी दुर्घटना अशी, की येथील भरत मधुकर साखरे यांच्या घराचे छतच वादळाने उडाले. या छताच्या लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात त्यांची पाचच महिन्याची चिमुकली झोपलेली होती. झोक्यासह तीदेखील उडाल्याने ५०० फुटावर पडून, आदळून तिचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. सई भरत साखरे असे या चिमुकलीचे नाव होते. या दुर्देवी घटनेने परिसरासह गावात हळहळ व्यक्त केली जात होती. गावातील दोन महिलाही वादळाने पत्रे उडून त्यावरील दगड अंगावर पडल्याने जखमी झालेल्या आहेत. विजेचे खांब पडल्याने तसेच तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झालेला होता. दरम्यान, चिखली तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, वीज पुरवठा सुरूळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते.
चक्रीवादळ व पावसाने देऊळगाव घुबे गावासह परिसरात हाहाकार उडविला होता. गावातील रामदास दगडू घुबे यांच्या घरावर दारी असलेले बाभळीचे झाड व विजेचा लोखंडी पोल पडल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर दुसरीकडे कविता प्रदीप शिंदेव व कांचन नितीन घुबे यांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याने टीनपत्रावरील ठेवलेले दगड अंगावर पडल्याने दोघीही जखमी झाल्या आहेत. त्यांना रात्रीच चिखली येथील जंवजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गणेश नारायण करंडे, संतोष नारायण करंडे, मधुकर साखरे, नारायण मधुकर साखरे, गणेश प्रल्हाद पेहरे, प्रकाश येडुजी घुबे, केशव शंभर घुबे, गुलाबराव चवरे, ओंकार घुबे, यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असल्याने त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. तसेच, घरामध्ये पाणी साचले होते. तसेच, गावाजवळील गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या चक्रीवादळाने अनेकांच्या घरावरील लोखंडी अँगलसह टीनपत्रे उडाली असून, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच, घरात पाणी साचल्याने अन्नधान्य व शेतीसाठी आणलेली खते, बियाणे हे ओले होऊन त्यांचीही मोठी नासाडी झालेली आहे. ऐन पेरणीच्या काळात हे संकट कोसळल्याने या शेतकर्यांना तातडीने शासकीय अनुदान देऊन त्यांना पेरणीकाळात अर्थसहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतमाल, बीबियाणे, खते यांच्या गोण्या भिजल्याने प्रचंड नुकसान झालेले आहे. देऊळगाव घुबे येथे सहा महिन्याची चिमुकली साई भरत साखरे ही टीनपत्रांसह उडून गेली आहे, ही अतिशय दुःखद घटना आहे. तरी प्रशासनाने तातडीने या नुकसानग्रस्तांची व्यवस्था करावी, व पंचनामे करून लवकरात लवकर या गावातील लोकांपर्यंत मदत पोहोचावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे.
——–—
तथापि, विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी उरला आहे. तरीदेखील गेल्या चार दिवसांपासून चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत जोरदार पाऊस व वादळे येत आहेत. सलग पडत असलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून, ग्रामीण भागात पेरण्यांनी जोर धरला आहे.