मुलाला विजेचा शॉक लागल्याने बचावासाठी आई धावली; दोघाही मायलेकांचा करूण अंत!
– दुर्देवी घटनांनी चाकण परिसरात हळहळ!
चाकण (विशेष प्रतिनिधी) – विजेचा शॉक लागून आई- आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकणमधील खराबवाडी येथे घडली. मुलाला विजेचा शॉक लागल्याने आई मदतीला धावली अन् हा अनर्थ घडला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, पती कामाला गेल्यानंतर विवाहितेने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाकण जवळील मेदनकरवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. ११ जून) सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. संबंधित विवाहितेने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने चाकण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली.
सविस्तर असे, की चाकण जवळील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागून मायलेकाची जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय १५वर्षे ) असे मृत मुलाचे नाव आहे. घराच्या छतावर आईसोबत १५ वर्षीय मुलगा समर्थ छतावर आला होता. यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली. त्यामुळे आईलाही शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मेदनकरवाडी येथे पती कामाला गेल्यानंतर विवाहितेने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेणूकुमारी राजाराम गोंड ( वय २५, सध्या रा. सिद्धिविनायक नगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. जारिगावा ता. जि. बक्सार ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती राजाराम विजय गोंड (वय २५, रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, राजाराम गोंड हे बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ते बिगारी कामासाठी घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर त्यांची पत्नी रेणूकुमारी हिने घरात कोणी नसताना घरातील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नसून चाकण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.