नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणार्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थ व युवकांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्र गाठून पोलिसांना निवेदन दिले. तसेच, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्याविरुध्द बोधेगाव परिसरातील सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून समाजा समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे गैरकृत्य काही समाजकंटकांनी केलेले आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ९ वाजता मुंडे समर्थकांनी बोधेगाव येथे गोपीनाथ मुंडे चौकात एकत्रित येवून संबंधित घटनेचा जाहीर निषेध केला. तसेच, संबंधित समाजकंटांकावर कायदेशीर कारवाई करून कडक शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस हेडकॉन्स्टेबल इश्वर गर्जे यांना देण्यात आले. यावेळी दिलीप खेडकर, महादेव दराडे, माजी सरपंच राम अंधारे, माणिक गर्जे, प्रकाश गर्जे, भीमा बनसोडे, लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, वंचित आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, भागवत भोसले, आदिनाथ मासाळकर, केशव खेडकर, आजिनाथ गर्जे, बाबा गिरी, भागवत शिंगाडे यांच्यासह बोधेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.
————-