श्रीकांत शिंदेऐवजी प्रतापराव जाधवांना केंद्रात मंत्रिपद; ‘पुत्रप्रेमा’ऐवजी एकनाथ शिंदेंचा ‘ज्येष्ठ शिवसैनिकाला न्याय’!
– खा. प्रतापराव जाधवांच्यानिमित्ताने आता जिल्ह्याला विकासाची संधी!
बुलढाणा/ मुंबई (खास प्रतिनिधी) – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्तेवर आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये आपल्या एकमेव कोट्यातून शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनाच संधी देतील, असे बोलले जात होते. श्रीकांत हे सलग तीन टर्म खासदार असून, राज्याचा तरूण चेहरा आहे. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुत्रप्रेमापेक्षा कर्तव्याला महत्व देत, बुलढाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली. खा. जाधव यांच्यानिमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकाला संधी मिळाल्याने दोन्हीही बाजूच्या कट्टर शिवसैनिकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात हाच फरक आहे, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होत असताना, मेहकरचे ज्येष्ठ आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार होती. त्यादृष्टीने रायमुलकर यांना निरोपही देण्यात आला होता. रायमुलकर हे नवा कोरा सुट शिवूनही तयार होते. परंतु, ऐनवेळी रायमुलकांऐवजी आदित्य ठाकरे या ‘फर्स्ट टर्म’ आमदाराला कॅबिनेट मंत्रिपदी संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी रायमुलकरांसारख्या सच्च्या शिवसैनिकावर अन्याय केला होता, अशी आठवणही यानिमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील काही शिवसैनिकांनी यानिमित्ताने काढली आहे.
शिवसेना (शिंदे गट) संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी खा. श्रीकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनाच केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी काही खासदार व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. खा. शिंदे यांचे निकटवर्तीय तथा खासदार नरेश म्हस्के यांनी तर पत्रकार परिषद घेत ही मागणी जाहीरपणे करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण केला होता. श्रीकांत शिंदे हे सलग तीनवेळा मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. शिवाय, ते तरूण नेतृत्व आहेत, त्यांचे कामही चांगले आहे. संसदेतही त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. तसेच, श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी भाजपदेखील अनुकूल होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी खासदार व आमदारांचा दबाव झुगारून, पक्षात ज्येष्ठ खासदार असलेले प्रतापराव जाधव यांचेच नाव भाजप नेतृत्वाकडे पुढे पाठवले. श्रीकांत शिंदे हे तीनवेळा निवडून आलेले आहेत, तर प्रतापराव जाधव हे चारवेळा निवडून आलेले आहेत. तसेच, ते विदर्भातील शिंदे सेनेचे एकमेव खासदार व ज्येष्ठ नेते आहेत. खा. प्रतापराव जाधव यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली गेली असती तर, एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच घराणेशाहीचा आरोप झाला असता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीचा आरोपदेखील टाळला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना केंद्रात स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून संधी देताना, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि पक्षाबाहेरदेखील एक महत्वाचा संदेश दिलेला आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. परंतु, शिंदे यांनी बारणेऐवजी प्रतापराव जाधव यांना संधी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी डॉ. संजय रायमुलकर यांच्यासोबत झालेल्या अन्यायाचीही आठवण काढली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी वरिष्ठ आमदार म्हणून डॉ. संजय रायमुलकर यांचे नाव पुढे आले होते. त्यांना शपथविधीसाठी तयार राहण्याची सूचनाही मिळाली होती. त्यानुसार, संजूभाऊ सुट-बूट घालून तयारही होते. परंतु, ऐन शपथविधीच्या दिवशी संजय रायमुलकरांचा पत्ता कट करून उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमाला प्राधान्य दिले व आदित्य ठाकरे यांना पहिल्याच झटक्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. पुढे रायमुलकर यांची लालदिवा असलेल्या एका समितीवर बोळवण केली गेली होती. ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे डॉ. रायमुलकर यांना धक्का तर बसलाच होता; परंतु ते ज्या अल्पसंख्याक अशा सुतार समाजातून येतात, त्या समाजातही उद्धव ठाकरे यांच्याविषयी संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर राज्यातील सुतार समाजाने ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पाठ फिरवून भाजप व शिंदे सेनेसोबत जाणे पसंत केले होते. आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पुत्रप्रेमाऐवजी ज्येष्ठ शिवसैनिकाला केंद्रात मंत्रिपदी संधी दिली, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन भूमिकेबद्दलची चीड ताजी झाली. तसेच, शिंदे यांनी कट्टर शिवसैनिकांची मने जिंकल्याची भावना जिल्ह्यात दिसून येत आहे.
प्रतापराव जाधव यांना केंद्रात स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देऊन त्यांच्यावर विदर्भ व मराठवाड्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष वाढविण्याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपावलेली आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसण्याची जबाबदारीही प्रतापराव जाधव यांच्यावर आहे. शेतमालाला भाव, पीकविम्याचे पैसे, शेगाव येथे विमानतळ, सिंदखेडराजा मातृतीर्थ नगरीचा विकास, खामगाव-जालना रेल्वेमार्ग, जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर, औद्योगिक विकास करून नोकरी व रोजगाराच्या संधी वाढविणे आदी महत्वपूर्ण कामांत त्यांना आता लक्ष घालावे लागणार आहे.
——–