बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केरळात २९ ते ३१ मे या कालावधीत मान्सून दाखल होणार आहे. १० जूनपर्यंत तो मुंबईसह कोकणात तसेच १५ जूनदरम्यान ‘सह्याद्री’चा घाटमाथा ओलांडून खान्देश, मराठवाडा व विदर्भात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, पंचांग शास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामान अंदाजातील पहिले पावसाचे नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. या नक्षत्राला शुक्रवारी, दि. २४ मेच्या मध्यरात्रीनंतर सुरुवात झाली आहे. परंतु, परंपरागतरित्या या नक्षत्रावर धूळ पेरणी करू नये, असा सल्ला शेतकर्यांना देण्यात आलेला आहे. पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असेही सांगण्यात आले. दरम्यान, एखादा पाऊस पडला, की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. किमान एक हितभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या आधीच्या अंदाजात पंजाबरावांनी 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असे सांगितले होते. म्हणजेच आता महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांना वेग द्यावा लागणार आहे. शेतीची बाकी राहिलेली कामे जलदगतीने पूर्ण करावी लागणार आहेत.
सध्या मान्सून प्रगतीपथावर आहे. आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभागही दोन हिस्याने काबीज केला असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकरही सक्रीय होऊ शकते. तसे झाल्यास मध्य महाराष्ट्र व खान्देशात मान्सूनचे आगमन अगोदरही होऊ शकते. अर्थात् हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडींवर अवलंबून असेल, असे माणिकराव खुळे म्हणाले. विदर्भात आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत रविवारपासून पुढील पाच दिवस अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश्यस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळीच्या स्थितीबरोबरच पुढील आठवडाभर म्हणजे शनिवारपर्यंत उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण वगळता महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान ४० ते ४४, तर पहाटेचे किमान तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सूर्य २४ मेच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राने प्रवेश केला. त्यानुसार ग्रह व वाहन हे या नक्षत्रातील पेरणी योग्य पावसाला अनुकूल नाहीत. मात्र, नक्षत्राच्या प्रथम चरणात वारा वादळासह पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येते. साधारणत: ३० मे ते ५ जूनच्या दरम्यान, दुपारनंतर केव्हाही वादळी वार्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हे पावसाळी वातावरण फारकाळ टिकणारे नसेल. पेरणीयोग्य पावसासाठी शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच १ जूननंतर उष्णतामान चांगलेच वाढण्याचा अंदाज दिसून येत आहे. तरी शेतकर्यांनी बियाण्यांच्या महागाईचा विचार करता, धूळपेरणीची घाई करू नये. शेतकरीवर्गाने हवामान शास्त्राचा ताजा अंदाज घेऊन आपल्या भागातील शेतीचे व पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पंजाबराव डख काय म्हणतात…
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जूनदरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. अर्थातच उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर तीन जून पासून ते 11 जूनपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल 11 दिवस बरसत राहणार आहे. परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे एक ते तीन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नादेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तीन जूनपासून ते पाच जूनपर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, लातुर, बिड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणापर्यत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सात जून पासून ते 11 जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. एकंदरीत उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.