Head linesNAGARPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

सोनविहीरच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर!

शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथील सरपंचा सौ. इंदूबाई रघुनाथ काकडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी बोलावलेल्या सदस्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला असल्याने सौ.काकडे यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

सात सदस्य संख्या असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच वगळता सहा सदस्यांनी दि.२७ मेरोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन गावाच्या सरपंच सौ.काकडे ह्या इतर सहा सदस्यांना कधीही विश्वासात घेऊन गावाची विकास कामे करत नसून, मनमानी करत असल्याने आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याने आम्ही आपल्याकडे रीतसर अविश्वास ठराव देत आहोत, असे तहसीलदारांना दिलेल्या अविश्वास ठरावामध्ये नमूद करण्यात आले होते. या दाखल ठरावावर तहसीलदार सांगडे यांनी सोनविहीर ग्रामपंचायत कार्यालयात १ जूनरोजी सर्व सदस्यांची बैठक बोलावली असता, या बैठकीला सरपंच इंदूबाई काकडे यांच्यासह रज्जाक रसूल बेग, अनिता भीवराज रोडगे, ज्ञानदेव सखाराम विखे, जिजाबाई नारायण विखे, दिलीप हरिभाऊ विखे व मीराबाई अण्णासाहेब टेमकर हे सर्वच्या सर्व सदस्य हजर राहिले होते. या सर्वांना तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाबाबतची माहिती दिली असता, सहाही सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने वर हात केले असल्याने दाखल ठराव एकमताने मंजूर झाला असल्याचे तहसीलदार सांगडे यांनी जाहीर केले. या वेळी तहसीदार यांना ग्रामसेवक बाळासाहेब दातीर यांनी मदत केली. दरम्यान, सौ. काकडे यांना मिळालेले सरपंच पद हे निवडणुकीनंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणातून मिळालेले होते, अशी माहिती समजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!