मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – पेरण्यांचे दिवस आले आहेत. लवकरच मान्सूनचे आगमन होत आहे. परंतु, पेरण्या उरकण्यासाठी पैसे नाहीत, तसेच बँका व खासगी सावकारही कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नैराश्य आल्याने शेतीसाठी कर्जबाजारी झालेल्या मेरा बुद्रूक येथील शंकर झुंजाजी डोंगरदिवे (वय ६६) या शेतकर्याने आज अशोक नारायण पडघान यांच्या शेतातील रामफळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला असून, सततची नापिकी, कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे हतबल झालेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या मार्गावर जात आहेत.
मेरा बुद्रूक येथील शंकर झुंगाजी डोंगरदिवे (वय ६६) यांनी आज सकाळी त्यांच्या शेताशेजारील अशोक नारायण पडघान गट नंबर १६८ यांच्या धुर्यावरील रामफळ या झाडाच्या दक्षिणेकडील फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे सामायिक क्षेत्रामध्ये गट नंबर २१० व २१३ मध्ये दोन एकर नऊ गुंठे जमीन आहे. सततची नापिकी, मालाचे पडलेले भाव, व कर्ज देण्यास बँकांनी चालवलेली टाळाटाळ यामुळे त्यांना नैराश्य आले होते. शेतीपिकांतून शेतीचा खर्चवजा जाता बाकी काही राहत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. आता समोर पेरणीचे दिवस आले असताना आणखीन शेतीला खर्च कुठून लावायचा, आर्थिक तडजोड कशी करायची, या विवंचणेत ते होते.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी कोतवाल सचिन पडघान व मेरा बुद्रूकचे पोलीस पाटील बद्री पडघान यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. ही माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमलदार गणेश देढे व वायाळ यांनी घटनास्थळी येऊन पंचासमक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर झुंगाजी डोंगरदिवे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, आणि दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार देढे हे करीत आहेत.