गुलाल कोण उधळणार? रविकांत तुपकर की प्रा. नरेंद्र खेडेकर?
– लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; बुलढाणावासीयांचे निकालाकडे लक्ष!
बुलढाणा/मुंबई (खास प्रतिनिधी) – देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून, उद्या दि. ४ जूनरोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली होती. बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे विजयाचा गुलाल उधळणार, की शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तथा महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर हे बाजी मारणार? याकडे मात्र बुलढाणा जिल्हावासीयांच्या नजरा लागून आहेत. खेडेकर यांच्या समर्थकांनी विजयाची जोरदार तयारी केली असल्याचे दिसून आले असून, तुपकर हे मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत दिसून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असला तरा,r त्यापूर्वी ‘एक्झिट पोल’चे अंदाज जाहीर झाले आहेत. या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ आघाडीला? याचे उत्तर उद्याच मिळणार आहे. इंडिया आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या सूचक प्रतिक्रियेनंतर मात्र काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असून, ‘आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. आम्हाला खूप आशा आहे की, निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील’, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही इंडिया आघाडी २९५ जागांवर विजयी होईल, असे ठासून सांगितले आहे. दरम्यान, भाजपप्रणित एनडीए आघाडी देशात ३५० जागांचा आकडा पार करेल, असा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. तथापि, या दाव्यांवर देशातील बहुतांश जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचे चित्र आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांवर यश मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्या, ४ जूनरोजी निकाल समोर आल्यानंतरच केंद्रात कुणाचे सरकार स्थापन होणार? हे स्पष्ट होणार आहे.
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. २२ जागांवर शिवसेना (ठाकरे), १३ जागांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ६ तर काँग्रेसला ४ जागा, शिंदे गटाला २ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज राजकीय नेत्यांच्या चर्चेतून पुढे येत आहे. तसेच, जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचेही म्हटले गेले आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? महायुतीला जास्त जागा मिळतात, की महाविकास आघाडीला मिळतात? हे आता उद्याच स्पष्ट होणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली असून, बुलढाण्यात अपक्ष उमेदवार तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे १० ते १२ हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात २६ एप्रिलरोजी ११ लाख ५ हजार ७६१ इतके मतदान झाले होते. या मतदानाची मतमोजणी मलकापूररोडवरील आयटीआयच्या इमारतीत होणार आहे. इटीपीबीएस मतमोजणीसाठी १८ टेबल लावले गेले असून, पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी १४ टेबल आहेत. इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीकरिता विधानसभा मतदारसंघानिहाय प्रत्येकी १४ टेबल आहेत. असे एकूण ८४ टेबल लावले जाणार आहे. इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी राहणार असून, त्यांच्या मदतीला एक कोतवाल कर्मचारी दिला जाणार आहे. एकूण १६०० कर्मचारी उद्याची मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत. बुलढाणा, सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रासाठी २४ फेर्या, चिखली, जळगाव जामोद, खामगाव विधानसभा क्षेत्रासाठी २३, मेहकरसाठी २५ फेर्या होणार आहेत. सर्वाधिक फेर्या या मेहकर विधानसभा क्षेत्रासाठी होणार आहेत.
————-