ChikhaliVidharbha

गरज नसलेला भक्तिमहामार्ग लादून भूमिहीन करू नका!

– भक्तिमहामार्गाला परिसरातील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध; जिल्हधिकार्‍यांना निवेदन

मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – राज्य सरकारने जिल्ह्यात भक्तिमहामार्ग प्रस्तावित केला असून, त्यामध्ये समृद्धी महामार्ग ते शेगाव या मार्गासाठी १०९ गावांची शेकडो एकर जमीन शासकीय भावाने अधिग्रहण करून शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा डाव राज्य सरकारने आखलेला आहे. या भक्तिमहामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असून, याबाबत भक्ति महामार्गविरोधी कृती समितीने वेळोवेळी निवेदन देऊन व हरकती नोंदवून शासनाला विरोध दर्शवला आहे. तरीसुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर ३० मेरोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे उपोषण करण्याचे ठरले होते. परंतु आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी यांनी सदर उपोषण पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती केली असता, सदर उपोषण आंदोलन हे पुढे ढकलण्यात आले. परंतु आज, दिनांक ३० मेरोजी भक्ती महामार्गविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना भक्ती महामार्ग होऊ नये म्हणून एक निवेदन देत, यासाठी आपण शासन दरबारी शेतकर्‍यांच्या संतप्त भावना कळवा, असे साकडे घातले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.

या निवेदनात नमूद आहे, की हा गरज नसलेला भक्ति महामार्ग करून शेतकर्‍याच्या जमिनी अधिग्रहण करू नका, आम्हाला देशोधडीला लावू नका, शेगावला जाण्यासाठी पर्यायी चार रस्ते असतानासुद्धा व भक्ती महामार्गाची गरज नसतानासुद्धा भक्ती महामार्ग होऊ घातलेला आहे. त्याला आम्हा शेतकर्‍यांचा पूर्णतः विरोध आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावागावांमध्ये शेतकर्‍यांनी लोकप्रतिनिधींना गावात येऊ न देण्याचे बॅनरसुद्धा झळकवले होते. ३० मेरोजी शांततेत उपोषण होणार होते. परंतु आपल्या विनंतीनुसार, व कायद्याचा भंग होऊ नये म्हणून सदर उपोषण हे पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा ७ मार्च २०२४ रोजी हजारो शेतकर्‍यांच्या प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. परंतु नंतर आचारसंहिता लागू असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तरी आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की, गरज नसलेला भक्ति महामार्ग करू नये, आणि शेतकर्‍यांना देशोधडीला लावू नये, अशी मागणी भक्ती महामार्गविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. हे निवेदन देतेवेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक, दासा पाटील, वाघ सर, गजानन चांदले, पत्रकार एकनाथ माळेकर, समाधान मस्के, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, व इतर शेतकरी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!