पाण्यासाठी उपोषण करणार्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचे उपोषण अखेर ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर सुटले!
– नळ पाणीपुरवठ्याचे काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करू
– गुरांच्या दवाखान्याजवळ पाईपलाईनमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा करू
– पाण्याचे टँकर वाढविणार, ग्रामपंचायत टँकर भाड्याने घेऊन पाणी पुरवठा करणार
– गावातील नालेसफाईचे कामही तातडीने सुरू करणार
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड येथे पिण्याच्या पाण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच, काल ग्रामस्थांनीदेखील गाव कडकडीट बंद ठेवून या उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ग्रामस्थांचा वाढता रेटा आणि उपोषणकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहाता, सरपंचांसह ग्रामपंचायत प्रशासन चांगलेच हादरले असून, आज (दि.३०) उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देत उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. या मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा देत उपोषणकर्त्या सामाजिक व राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी आजअखेर आपले उपोषण मागे घेतले आहेत.
उपोषणकर्त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनांत नळ पाणीपुरवठ्याचे काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करू, गुरांच्या दवाखान्याजवळ पाईपलाईनमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा करू, पाण्याचे टँकर वाढविणार असून, ग्रामपंचायत टँकर भाड्याने घेऊन पाणी पुरवठा करणार आहे. तसेच, गावातील नालेसफाईचे कामही तातडीने सुरू करणार असल्याचे लेखी स्वरूपात देण्यात आलेले आहे. काल ग्रामस्थांनी कडकडीट बंद पाळला होता. तसेच, गावातील व्यापारीवर्गानेदेखील या बंदला उत्स्फुर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन चांगलेच हादरले होते. या उपोषण आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक नेते जुनेद अली, सुनील जायभाये, गजानन जायभाये, शैदाद पठाण, अर्जुन घुगे, हलीमखा पठाण, पांडुरंग वाघ आदी सहभागी झाले होते. तर उपोषण सुटतेवेळी डॉ. शिंदे, कचरूजी बारस्कर, रहेमान शेख, प्रभाकर ताठे, प्रकाश सांगळे, दिलीप देशमुख, प्रकाश केवट, कौसर काजी, शेख अनीस, जाकेर पठाण, साबीर पठाण, तन्वीर फौजी, कडुबा पवार, सुरज कुटे, बबन कुटे, कडुबा पवार, एकनाथ सरवदे, बबन बरांडे, उमर टेलर, इमाम शेख, सचिन घुगे, अदीम पठाण, शेख शकील मिस्त्री, शेख हनीफ, फारूख भाई निजाम, मास्टर शेख, शेख सत्तार, शेख बिलाल, शेख लतिफ, बबन नाळे, संजय पवार, संजय खेत्ररे, जुनेद टेलर,, शेख अख्तर, अख्तर भाई, लक्षण सांगळे, शिवनारायण सांगळे, अनीलभाऊ सांगळे, अशोक सांगळे आदी उपस्थित होते.
दुसरबीडवासीयांवर आली पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाची वेळ!